दंड न भरल्यास शशिकलांना आणखी १३ महिने तुरुंगवास
By admin | Published: February 22, 2017 01:07 AM2017-02-22T01:07:33+5:302017-02-22T01:07:33+5:30
बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के.
बंगळुरू : बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला १० कोटी रुपयांचा दंड भरला नाही तर त्यांना आणखी १३ महिने तुरुंगात राहावे लागेल. तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी ही माहिती निवेदनाद्वारे दिली.
सध्या शशिकला या येथील परापन्ना अग्रहारा तुरुंगात आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना खालच्या न्यायालयाने ठोठावलेली प्रत्येकी चार वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी १० कोटी रुपये दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी कायम ठेवली. शशीकला या तीन वर्षे ११ महिने तुरुंगात राहतील.
खालच्या न्यायालयाने त्यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी त्या २१ दिवस त्या परापन्ना अग्रहारा तुरुंगात सप्टेंबर २०१४ मध्ये होत्या. शशिकला, इल्लावारासी आणि सुधाकरन यांना इतर सामान्य कैद्यांसारखीच मिळणारी वागणूकच मिळत आहे. या तिघांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही, असे कुमार यांनी सांगितले.
सुरक्षेच्या कारणावरून शकला आणि इल्लावारासी यांना महिलांच्या स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले असून त्या दोघी छोट्याशा खोलीत राहात आहेत. सुधाकरन यांना पुरुषांच्या विभागात ठेवण्यात आले आहे. तुरुंगाच्या भटारखान्यात कैद्यांसाठी तयार झालेले जेवणच त्यांना दिले जाते आणि तुरुंगाचे डॉक्टर्स नियमितपणे त्यांची तपासणी करून औषधे देतात, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
वातानुकूलन यंत्रणेची मागणी अमान्य
सर्वांसाठीच्या जागेत त्यांना दूरचित्रवाणी बघण्याची परवानगी आहे. मात्र वातानुकुलीन यंत्रणेची शशिकला यांची मागणी अमान्य करण्यात आली आहे. तसेच घरुन आणलेल्या साड्या नेसायची त्यांना परवानगी नाही.
कारागृहाने दिलेल्या तीन सुती साड्याच त्यांना वापराव्या लागत आहेत. त्यांना रोजच्या रोज मेणबत्त्या आणि उदबत्त्या करण्याचे काम दिले असून, त्यासाठी त्यांना रोज ५0 रुपये इतका मेहनताना मिळतो. आठवड्याचे सातही दिवस त्यांना हे काम करावेच लागते.