शशिकलांना तुरुंगवास
By admin | Published: February 15, 2017 04:02 AM2017-02-15T04:02:35+5:302017-02-15T04:02:35+5:30
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपये दंड
चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा
कोटी रुपये दंड अशी शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्यामुळे, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पार धुळीस मिळाले आहे. मुख्यमंत्रिपद तर हुकले आणि आला नशिबी तुरुंगवास, अशी त्यांची स्थिती झाली असून, गोल्डन बे रिसॉर्टमध्ये बसून असलेल्या शशिकला रात्रीपर्यंत पोलिसांना शरण गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी कर्नाटक पोलीस बंगळुरूहून चेन्नईला रवाना झाले आहेत.
मात्र, त्या आधी ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात त्या यशस्वी ठरल्या असून, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असेल?, पनीरसेल्वम की पलानीसामी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेतला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र शशिकला यांना तो अधिकारच नाही आणि पलानीस्वामी यांची निवडही बेकायदा आहे, असे पनीरसेल्वम सांगत आहेत.
मुख्यमंत्रीपदी आपलाच समर्थक असायला हवा, अशी शशिकला यांचा प्रयत्न आहे. ई. के. पलानीस्वामी यांनी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सरकार स्थापन्याचा मंगळवारी दावा केला. राव यांच्याशी पलानीस्वामी यांची अल्पकाळ भेट झाली तीत त्यांनी त्यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी सादर केली. यावेळी त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नेते व मंत्रीही होते.
पनीरसेल्वम यांनीही त्यानंतर राज्यपालांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपणावर जबरदस्ती करण्यात आली होती, तो आपणास मागे घ्यायचा आहे, असे नमूद केले. त्याआधी अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदारांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन पनीरसेल्वम यांनी केले. गेल्या आठवड्यात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. आता सरकार स्थापन होणार याबद्दल मला खात्री आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
नेतेपदी पलानीस्वामी
पनीरसेल्वम यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, अशी भूमिका असलेल्या शशिकला यांनी आता एडापडी के. पलानीस्वामी यांची अण्णा द्रमुक आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करवून घेतली.
पनीरसेल्वमचा जोर वाढला
शशिकला मुख्यमंत्री होणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे मुख्यमंत्री पनीरसेल्वम गटात आनंदाचे वातावरण असून, आता आणखी काही आमदार आपल्याकडे येतील, असे मुख्यमंत्र्यांचे समर्थक सांगत आहेत. या आमदारांचे मन वळवण्यासाठी पनीरसेल्वम गटाचे काही नेते आज गोल्डन बे रिसॉर्टकडे निघाले होते, पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून परत पाठवले.