Shiv Sena: लोकसभा सचिवांकडून पक्षपात, शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीवर शिवसेनेचा तीव्र आक्षेप, विनायक राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:30 AM2022-07-21T11:30:59+5:302022-07-21T11:31:50+5:30
Shiv Sena: शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप सुरू असून, सेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील १२ खासदारांचा गटही शिंदेगटात दाखल झाला आहे. दरम्यान, या गटाने राहुल शेवाळे यांना आपले गटनेते आणि भावना गवळी यांना आपल्या प्रतोद म्हणून नियुक्त करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर या नियुक्तीला मान्यताही मिळाली होती. मात्र आता शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या आमच्या दोन्ही पत्रांची दखल न घेता नव्या गटनेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचं हे पत्र पोर्टलवर २० तारखेला आलं आहे. मात्र आम्हाला ते १९ तारखेला वाचायला मिळालं. तर लोकसभेतील जागांच्या तरतुदीच्या पत्रावर १८ तारीख नमूद आहे. नियुक्तीचं पत्र १९ तारखेला काढलं आणि त्याची अंमलबजावणी १८ तारखेपासून झालेली आहे. आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. जर त्यांना आमची दखल न घेता निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी जेव्हा पत्र दिला तेव्हापासूनच मान्यता द्यायला हवी होती. याबाबत आम्ही लेखी तक्रार करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.
आमचा गटनेता निवडण्याचा अधिकार फक्त शिवसेना पक्षप्रमुखांना आहे. आता अत्यंत घाईने गटनेता नियुक्त करण्यात आला आहे. आम्ही दिलेल्या पत्रांची दखल घेऊन आमची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. मात्र एकतर्फी निर्णय घेत लोकसभा कार्यालयाने आमच्यावर अन्याय केला आहे, असं आमचं मत आहे. लोकसभा सचिवांच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेणार आहोत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.