शिवसेनेचं 'उत्तरायण'! उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 07:10 AM2019-01-22T07:10:29+5:302019-01-22T07:12:43+5:30
बिहार, जम्मूतही उमेदवार देण्याचा शिवसेनेचा विचार
मुंबई: सत्तेत असूनही अनेकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी शिवसेना येत्या निवडणुकीत देशभरात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मित्र पक्षांसह निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे. लवकरच याबद्दलची घोषणा शिवसेनेकडून केली जाऊ शकते.
महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं उत्तर प्रदेशात पक्षविस्तार करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'नवभारत टाईम्स' या हिंदी वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. येत्या लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवार देण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मूमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे. या राज्यात सध्या शिवसेनेकडून मित्रपक्षांचा शोध सुरू आहे.
उत्तर प्रदेशात भाजपाचे मित्र पक्ष संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या पक्षांच्या मदतीनं उत्तर प्रदेशात 25 जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांच्यासोबत अनेक बैठका झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं.