Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:18 PM2019-02-15T17:18:21+5:302019-02-15T17:23:37+5:30

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

Shiv Sena demands joint session of Parliament to hold discussions over Pulwama Attack | Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेनं संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. काल पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 38 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. 




देशाच्या पंतप्रधानांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये पाकिस्तानला इशारा दिला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्जिकल स्ट्राइकच्याही पुढे जाऊन पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. आता हल्लेखोरांना सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. निवडणुकांचा प्रचार जाऊ द्या, पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा. पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी उद्धव यांनी केली. 

2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. याचा संदर्भ देत उद्धव यांनी त्यापेक्षाही कठोर कारवाईची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. तो भारताचाच भाग आहे. मात्र आता त्यापेक्षा पुढे जाण्याची गरज असल्याचं उद्धव म्हणाले. 

सध्या सरकारकडून देशातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र पूर्ण देश शांतच आहे. शांत राहण्याशिवाय देशातील जनता आणखी काय करु शकते? पण तुम्ही का शांत आहात?, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला. पाकिस्तानात घुसा आणि मोठी कारवाई करा. संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. 

काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

Web Title: Shiv Sena demands joint session of Parliament to hold discussions over Pulwama Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.