“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:55 PM2021-04-01T13:55:25+5:302021-04-01T14:04:12+5:30
विरोधकांनी केंद्र सरकावर टीका करण्यास सुरुवात केली असून, राजकारण तापले आहे.
नवी दिल्ली : कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिकांना धक्का देणारा अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय केंद्र सरकारने काही तासांत बदलला. व्याजदर कपात मागे घेत ते 'जैसे थे'च ठेवल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळीच जाहीर केले. यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकावर टीका करण्यास सुरुवात केली असून, राजकारण तापले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात टीका केली असून, निर्मला सीतारामन यांना व्याजकपातीबाबतची माहिती सकाळी पेपर वाचल्यावर मिळाली असावी, असा चिमटा काढला आहे. (priyanka chaturvedi on withdraw interst rate cut decision)
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. सकाळी पेपरमधील बातम्या वाचल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना व्याजकपातीबाबतीत समजले असावे, असे चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही टीका केली आहे.
Withdrawn. Looks like, the FM realised there has been a cut announced after reading today morning’s headlines in all the leading newspapers.
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) April 1, 2021
Truth though is, the GoI policies are a result of oversight hence the failing economy.
चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेची पडझड
व्याजदरात कपात करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. असे वाटते की, सकाळी महत्त्वाची वृत्तपत्रे चाळल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याजकपात झाल्यासंदर्भातील माहिती मिळाली. खरे हे आहे की, सध्याच्या सरकारची धोरणे ही चुकून घेतलेल्या निर्णयासारखी असल्यानेच अर्थव्यवस्थेची पडझड होत आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार?
निवडणुकांमुळे हा निर्णय मागे घेत आहात का?
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. खरंच निर्मला सीतारामन तुमच्याकडून सरकारी योजनांवरील व्याजकपात करण्यासंदर्भातील निर्णय चुकून प्रसिद्ध झाला की, निवडणुका लक्षात घेता तुम्ही हा निर्णय मागे घेत आहात?, अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली आहे.
प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्याजदर कपातीसंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार, पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर 'जैसे थे' राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.