...तर बेळगावातील मराठी बांधवांना सुटकेचा निःश्वास सोडता येईल- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:44 AM2020-01-19T10:44:14+5:302020-01-19T10:57:50+5:30
मी महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेंना सांगेन.
मुंबईः सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संजय राऊत काल दुपारी 3.30 वाजता बेळगावात पोहोचले. बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांनी प्रकट मुलाखत दिली. तसेच संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेत बेळगाव प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
मी महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेंना सांगेन की, बेळगावची परिस्थिती अन् लोकांच्या भावना काय आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 वर्षांपासून ते लटकत पडलं आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. त्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही. असंख्य वर्षांनी राम मंदिराचा प्रश्न न्यायालयातून सुटला. न्यायालयाच्या माध्यमातूनच या प्रकरणाचा निकाल लागायला हवा, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक सीमाप्रश्न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हा संघर्ष लवकर सोडविता येईल. महाराष्ट्र सरकारनं आपापल्या परीनं भूमिका पुढे नेली. हरिश साळवे हे जगातील सर्वोच्च वकील आहेत. ब्रिटनच्या महाराणीचेही तेच वकील आहेत. तेच वकील आपलेही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले आहेत.
Sanjay Raut, Shiv Sena, in Belgaum: Marathi people in Belgaum (Karnataka) & adjacent areas have been fighting since 70 yrs, to be included in Maharashtra. Matter is before Supreme Court but it has been sub-judice since 14 years. We will accept whatever the Supreme Court decides. pic.twitter.com/8M2ejzYBto
— ANI (@ANI) January 19, 2020
दरम्यान, 70 वर्षं संघर्ष केला, हुतात्मे झाले. पोलीस केसेस होत आहेत, डोकी फुटत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी एकदा चर्चा केली पाहिजे. या प्रश्नावर तातडीनं काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भात चर्चा झाली तरी बेळगावातील मराठी बांधवांना सुटकेचा निःश्वास सोडता येईल. ही लढाई मराठी भाषा, संस्कृती, साहित्य यासंदर्भातली आहे. ती टिकवायला पाहिजे. ती टिकेल असं वाटतं. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भेटून यावर चर्चा घडली पाहिजे. न्यायालयाच्या निकालात अजून किती पिढ्या जातील ते सांगता येत नाही. बेळगावातील नागरिक हे देशाचे नागरिक आहेत. त्यांची काळजी घेणं हे कर्नाटक सरकारचं कर्तव्य आहे, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
Sanjay Raut: Lakhs of Marathi people live here,they'll follow their language&culture. I'd like to appeal to K'taka CM,that set aside the border dispute,but don't get into language dispute. I'll also speak to CM Thackeray that both CMs should discuss urgent remedies in this matter https://t.co/L4qszgLLfD
— ANI (@ANI) January 19, 2020
महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशीच भूमिका आहे, असेही राऊत यांनी काल दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये. धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा अशी गाडगे महाराजांची जी भूमिका होती तीच आम्ही पुढे घेऊन चाललोय, असंही राऊत म्हणाले.
17 जानेवारी 1956 यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.