शिवसेनेने दिल्ली सोडली वाऱ्यावर!
By admin | Published: February 1, 2015 02:40 AM2015-02-01T02:40:34+5:302015-02-01T02:40:34+5:30
पक्षनेत्यांच्या ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो’ भूमिकेमुळे शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची स्थिती दयनीय झाली आहे.
पक्षनेत्यांचे हात वर : निवडणूक रिंगणातील उमेदवार झाले सैरभैर
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
पक्षनेत्यांच्या ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो’ भूमिकेमुळे शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची स्थिती दयनीय झाली आहे. सेनापती आणि सरदारांनीच हात वर केल्याने ‘दिल्ली’ जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले मावळे सैरभैर झाले आहेत.
महाराष्ट्राबाहेर आपला झेंडा फडकविण्यासाठी शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत १९ जागांवर उमेदवार उभे केले. पण पक्षाच्या पाठबळाअभावी ते सारेच वाऱ्यावर आहेत. पक्षाकडून रसद मिळत नसल्याचे पाहून काही उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराशी मांडवली केली आहे, तर काहींनी प्रचार थांबविला आहे. आदित्य ठाकरे यांच्या रोड-शोसाठी विनंती करूनही शिवसेना भवनातून प्रतिसाद नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर शिवसेनेने उमेदवार उभा केला, पण त्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला!
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर आहे. पण त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याची तक्रार आहे. काही उमेदवारांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या भेटीसाठी बंगल्यात गेले, पण तिथे पाणीही कोणी विचारले नाही. पक्षनेत्यांनीच या निवडणुकीत पाठ फिरविल्यामुळे शिवसेनेसाठी ‘दिल्ली अभी बहोत दूर है!’
विजयाबाबत साशंक!
शिवसेनेची राजकीय स्थिती अत्यंत हलाखीची आहे. आमचा एकही उमेदवार विजयी होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. पण यानिमित्ताने पक्ष घराघरापर्यंत पोहोचतो, संघटना मजबूत होते म्हणून शिवसेना निवडणुकीत उतरली आहे़
-ओमदत्त शर्मा
शिवसेना प्रदेशाध्यक्ष, दिल्ली
पक्षसंघटनेचा विस्तार करण्यासाठी दिल्ली विधानसभा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील देऊन लढाईचे बिगुल फुंकले खरे, परंतु ते स्वत: अथवा त्यांचे शिलेदार यापैकी कोणीही दिल्लीकडे फिरकले नाही की, प्रचार साहित्यही मिळाले नाही़