Shiv Sena MP Revolt: शिवसेनेला दिल्लीतही हादरा! मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत १२ खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:08 PM2022-07-19T18:08:18+5:302022-07-19T18:09:13+5:30
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नवी दिल्ली-
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून केली. तसंच खासदार भावना गवळी मुख्य प्रतोद असल्याचंही ते म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना १२ खासदारांनी याबाबतचं पत्र दिलं असल्याचीही माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
"जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या १२ खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत- शिंदे
ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावापोटी खासदार फुटले आहेत अशी टीका संजय राऊत यांच्याकडून केली जात आहे. याबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सणसणीत टोला लगावला. "दुसरं कोण बोललं असतं तर मी बोललो असतो. पण संजय राऊत काही दखल घेण्यासारखे नाहीत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच संजय राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात. त्यांचं बोलण्याला काय महत्व द्याययं?, असंही ते म्हणाले.
या खासदारांचा समावेश
श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.