हवेत उडणारे बुडबुडे फार काळ टिकणार नाहीत; संजय राऊतांचा शिंदे-भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:31 AM2022-07-18T10:31:00+5:302022-07-18T10:38:07+5:30
शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल असं संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. इंग्रजांच्या काळात आदिवासी समाजानं लढे दिलेत. त्यांचे प्रतिनिधित्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. पहिल्यांदाच या समाजाला इतक्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळतेय या भावनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही एनडीएत असताना युपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच असा निर्णय घेतला नाही. त्यामुळे आश्चर्यचकीत आणि संभ्रमित होण्याचं कारण नाही. हेमंत सोरेन यूपीएत आहेत त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्रात त्यांच्या मतांचा टक्का वाढेल असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. आज जे काही बुडबुडे हवेत उडतायेत ते फार काळ राहणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपा नेत्यांनाही माहिती आहे. तसं नसतं तर १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार टाळला जातोय तो टाळण्यात आला नसता. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवत असतो. या देशातील राजकारणाला काही अर्थ राहिला नाही. जगभरात कुठलाही गट निर्माण झाला तो आमचाच या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला.
दरम्यान, महाराष्ट्र स्थिर सावर होईल, शिवसेना-महाविकास आघाडी राज्यात पुन्हा काम करताना दिसेल. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. कायदा, नियम आणि घटनेवर आमचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात न्याय मेलेला नाही, रामशास्त्री आहेत याचा प्रत्यय भविष्यात येईल. दोन जणांचे मंत्रिमंडळ १५ दिवस चालले जगात लोकशाहीची अशी चेष्टा झाली नाही. इतका मोठा गट, इतका मोठा भाजपा, इतकं मोठं बहुमत मग १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळ का स्थापन झाले नाही? कारण अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर असल्याने विस्तार टाळला जातोय असंही संजय राऊत म्हणाले.