आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:21 AM2022-12-22T11:21:08+5:302022-12-22T11:21:37+5:30
जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
नवी दिल्ली - राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत तो हलकटपणा, नीचपणा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशाप्रकारे उभे केले शेवटी ते त्यांच्यावर उलटलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक यंत्रणांनी केला. सुशांत राजपूतची आत्महत्या हे स्पष्ट केले. ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप आहेत. जे कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होते ते आदित्य ठाकरेंवर आरोप करतायेत ते किती वैफल्यग्रस्त झालेत हे दिसून येते अशाप्रकारे खासदार संजय राऊत यांनी राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात सरकारवर विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड वाटपाचे जे आरोप सुरू आहेत. त्याला तोंड देताना सरकारची पळापळ आणि धावपळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी कुणी असे आरोप करत असतील तर ते भ्रमात आहे. हे सरकार भ्रष्ट मार्गाने बनलं आणि भ्रष्ट मार्गानेच ते पडेल. आमच्यावर किती आरोप केलेत. तुरुंगात पाठवले तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाहीत. मागे हटणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच जे हा खेळ खेळतायेत त्यांचे राज्य औटघटकेचे आहे. या सगळ्यांना पश्चाताप होईल. बिहार पोलीस कोण? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? सीबीआयनं क्लीनचीट दिल्यावर बिहार पोलिसांचे काय घेऊन बसलात. मुळात हे प्रकरण ज्यांनी काढले त्यांनी स्वत:ला पाहावं. संसदेत विषय काय होता आणि मुद्दा काय उकरून काढला. हे घाणेरडे प्रयोग केले जातायेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. अशा खूप फाईली निघू शकतात. घरातल्या सुद्धा. फाईलींची लढाई सुरू झाली तर सगळ्यांना महागात पडेल असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला.
दरम्यान, जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात. पक्षाने पदे दिली म्हणून अनेकजण मोठे झाले. हकालपट्टी करेपर्यंत तुम्हाला नावं माहिती नव्हती. मंत्री निघून गेले संपर्कप्रमुखाचं काय घेऊन बसलेत. पक्षातून काही बाजूला झाले असतील तर त्यांचा निकाल निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात लागेल. प्रत्येक पक्षात माणसं येत जात असतात. पक्ष कधी संपत नसतो. काही स्वार्थी, बेईमान लोक निघून जातात. जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार? २०२४ ला जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असंही संजय राऊतांनी बजावलं.