"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:19 AM2021-12-09T11:19:00+5:302021-12-09T11:20:03+5:30

शरद पवारांना खुर्ची दिल्यानं टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा राऊतांकडून रोखठोक समाचार

shiv sena mp sanjay raut hits back at bjp leaders indirectly slams pm narendra modi | "ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं

"ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, त्यांनी..."; राऊतांनी भाजपाला सुनावलं

Next

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी खुर्ची आणत असताना दिसत आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राऊतांवर टीका केली. त्या टीकेला राऊतांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं. ज्येष्ठांचा आदर करणं हा आमच्यावर झालेला संस्कार आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं बंद करा, असं राऊत म्हणाले.

राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले १२ खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर धरणं आंदोलन करत आहेत. त्यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचले होते. पवारांचं वय जास्त आहे. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यामुळे मी त्यांना खुर्ची आणून दिली. ज्येष्ठांचा आदर करणं, त्यांचा सन्मान करणं हा आमच्यावर झालेला झालेला संस्कार आहे. त्यावरून कोणाला राजकारण सुचत असेल तर ती संस्कृती नव्हे, विकृती आहे अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांचा समाचार घेतला.

शरद पवारांच्या जागी लालकृष्ण अडवाणी असते, तरीही मी त्यांना खुर्ची दिली असती. मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव असते तरीही मी त्यांना खुर्ची आणून दिली असती. कारण समोरच्या व्यक्तीला बसण्यासाठी पाट द्यावा असं आपली संस्कृती सांगते. ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना बसण्यासाठी खुर्ची सोडा, समोर उभंही राहू दिलं नाही, त्यांना आम्हाला प्रश्न विचारू नये, असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

शरद पवार, लालकृष्ण अडवाणी ही पितृतुल्य व्यक्तीमत्त्व आहेत. बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू आहेत. यशवंतराव चव्हाण यांना मी आदर्श मानतो. ज्येष्ठांचा आदर करावा हा संस्कार मला बाळासाहेबांकडून मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यांना केवळ राजकारण दिसतं, त्यांनी त्यांच्या डोक्यातला कचरा साफ करावा. अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला डंम्पिंग ग्राऊंडमध्ये गाठेल. असेच प्रकार सुरू ठेवलेत, तर राज्यात तुमचं सरकार कधीच येणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना सुनावलं.

Web Title: shiv sena mp sanjay raut hits back at bjp leaders indirectly slams pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.