"उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील?" संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:46 PM2023-12-06T13:46:30+5:302023-12-06T13:50:20+5:30
"INDIA आघाडीला एक चेहरा असावा यात वादच नाही, पण..."
Sanjay Raut on Uddhav Thackeray as PM canditate face for INDIA Alliance : इंडिया या विरोधकांच्या आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपाने मोठं यश मिळवलं. काँग्रेसला केवळ एका राज्यात सत्ता मिळवता आली तर मिझोरम या सीमेवरील राज्यात मतदारांनी स्थानिक पार्टीला पसंती दिली. काँग्रेसला निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ६ डिसेंबर म्हणजेच आज इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती. मात्र या आघाडीतील काही वरिष्ठ नेतेमंडळी नाराज असल्याचे समजले आणि त्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता या आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी विविध नावांची चर्चा होत आहे. असे असताना, आज संजय राऊतांनी या पदासाठी उद्धव ठाकरे दावेदार ठरू शकतात का, याबाबत एक सूचक विधान केले.
नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या पार्टीकडून त्यांची नावे पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी सुचवली जात आहेत, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, "या सर्व मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. इंडिया हे विरोधकांची एकजूट आहे. ही एक महाआघाडी आहे. ही कोणत्याही प्रकारची हुकूमशाही नाही. येथे चर्चा घडते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात जेव्हा NDA आघाडी होती, तेव्हा ती आघाडीदेखील चर्चा करून निर्णय घेत असे. आताची NDA तशी नसली तरी आताची INDIA आघाडी मात्र चर्चांना प्राधान्य देते. INDIA आघाडीला एक चेहरा असावा हा मुद्दा नक्कीच योग्य आहे. यात काहीच दुमत नाही. यावर पुढील बैठकीत नक्कीच चर्चा केली जाईल."
#WATCH | On PM face of INDIA bloc, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says," There will be a discussion on this. There should indeed be a face...Uddhav Thackeray is a Hindutvawadi, nationalist face. A person who gets the approval of the INDIA alliance members can be the (PM) face. I… pic.twitter.com/NXVwOHUC4V
— ANI (@ANI) December 6, 2023
महाराष्ट्रातून पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होऊ शकते का? असाही सवाल त्यांनी विचारण्यात आला. त्यावर सर्वप्रथम संजय राऊत हसले. त्यानंतर ते म्हणाले, "उद्धव ठाकरे हा हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी चेहरा आहे. पण आम्ही असं काही आता बोलू शकत नाही. INDIA आघाडीत ज्या व्यक्तीच्या नावाला सर्वांची संमती असेल तोच योग्य उमेदवार ठरेल असे मला वाटते. पण सध्या तरी बैठकीबाहेर आम्ही असं कुठलंही भाष्य करणार नाही, यामुळे INDIA आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होतील," असे म्हणत राऊतांनी यावर स्पष्ट उत्तर देणे टाळले.