Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 03:54 PM2022-07-06T15:54:49+5:302022-07-06T15:55:12+5:30
Maharashtra Political Crisis: नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत संतापल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून आता आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता नेहमीप्रमाणे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना एकामागोमाग एक सलग तीन प्रश्न विचारले. यावर, मी बोलणार नाही, असे सांगत उत्तर देणे टाळले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष तीव्र झाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले खरे, मात्र त्यांचा स्वपक्षीय नेत्यांसोबतच सामना रंगू लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर बंडखोरांविरोधात बोलताना शेलक्या शब्दांत निशाणा साधला. राऊत यांच्या टीका जिव्हारी लागल्याने बंडखोर आमदारांनी थेट विधिमंडळातूनही आपला राग व्यक्त केला. यानंतर बुधवारी नवी दिल्लीत संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.
एकामागून एक सलग तीन प्रश्न
एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य, विधिमंडळात शिंदे आणि फडणवीस यांच्यातील समन्वय यासंदर्भात संजय राऊत यांना काही प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आले. हे प्रश्न विचारताच संजय राऊत हे काहीसे संतापल्याचे पाहायला मिळाले. मी अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही, आता नव्या सरकारचे बहुमत सिद्ध झाले आहे, त्यामुळे तो विषय आमच्यासाठी संपला आहे, काही महत्त्वाचे असेल तर विचारा, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, बंडखोर आमदार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांना ईडीकडून दिलासा मिळत आहे. नुकताच एकाला जामीन मिळाल्याचे मी पाहिले. या लोकांवर चुकीचे आरोप झाले होते. खासदार भावना गवळी यांच्या एका निकटवर्तीयाला जामीन मिळाला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, मात्र याचं जे टायमिंग आहे ते गमतीशीर आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.