"गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:33 AM2021-05-23T10:33:46+5:302021-05-23T10:38:44+5:30

खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकावर निशाणा. कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली, राऊत यांची सरकारवर टीका.

shiv sena mp sanjay raut slams bjp government on covid 19 condition river ganga rokhthok editorial | "गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही"

"गंगा ही पाप शुद्धीकरणासाठी होती, आज तिचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही"

Next
ठळक मुद्देकोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो, राऊत यांची सरकारवर टीकागंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला : संजय राऊत

"संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका ‘मास्कमुक्त’ झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळविला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली," असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

"आता कोरोनाची तिसरी लाट येत आहे. काय सांगावे? लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल. या सगळय़ांतून बाहेर पडण्याचा मार्ग आमच्या राज्यकर्त्यांकडे नाही. गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱया पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा," असं म्हणत राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या रोखठोक या सदरातून भाजपवर जोरदार टीका केली.

भेसूर चेहरा समोर आणला

"लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत. भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना विचारले, ‘आपण कोरोनापासून कसा बचाव करीत आहात?’ यावर त्यांनी सांगितले, ‘सोपे आहे. मी रोज गोमूत्र प्राशन करते. गोमूत्रामुळेच कोरोना माझ्यापर्यंत पोहोचला नाही!’हिंदुस्थानातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला," असं म्हणत राऊत यांनी यावर टीका केली. 

देश मोडतोय

जिवंत माणसं खोटे बोलतील, पण मृत्युशय्येवरील माणूस सहसा खोटे बोलत नाही. पण आता तर गंगेत तरंगणारे, प्रवाहात वाहत येणारे हजारो मुडदेच सत्य बोलत आहेत. ‘होय, आम्ही कोरोनामुळे मेलो. आम्ही मेल्याचे आकडे लपवण्यात आले. आम्हाला जाळायला, पुरायलाही जागा नसल्याने गंगेच्या प्रवाहात आम्हाला सोडून दिले…’ हा मुडद्यांचा आक्रोश आहे. त्यांचा आवाज कसा ऐकणार? प्रेते तरंगत आहेत. देश बुडत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.  

लस कुठे गेली?

‘मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?’ अशी विचारणा करणारी पोस्टर्स दिल्लीच्या भिंतीवर कुणी तरी चिकटवली आणि रोजंदारीवर काम करणाऱया 25 गरीब मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. आता मुंबईत काँग्रेसने तीच पोस्टर्स उघडपणे लावली. देशात लसीचा तुटवडा आहे व लसीकरण थांबले आहे. हिंदुस्थान सगळय़ात मोठा ‘व्हॅक्सिन उत्पादक’ देश आहे. सरकारने 12 एप्रिलला ‘लस उत्सव’ साजरा केला, पण लसीचा ठणठणाट होता. गेल्या 30 दिवसांत लसीकरणात 80 टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱया फॅक्टऱयांत जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी हिंदुस्थानातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे हिंदुस्थानात बनलेली ही लस आधी मोठय़ा प्रमाणावर परदेशात पोहोचली व हिंदुस्थानात प्रेतांचे खच पडले. मुडदे गंगेत तरंगत राहिले. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ हा प्रश्न त्यामुळे चुकीचा ठरत नसल्याचं राऊत यांनी आपल्या सदरातून म्हटलं आहे.

Web Title: shiv sena mp sanjay raut slams bjp government on covid 19 condition river ganga rokhthok editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.