दिल्लीऐवजी सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती- संजय राऊत
By कुणाल गवाणकर | Published: February 2, 2021 12:05 PM2021-02-02T12:05:31+5:302021-02-02T17:56:47+5:30
शिवसेना नेत्यांचं शिष्टमंडळ आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
नवी दिल्ली: शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे. तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांपेक्षा वरची आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदार संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवर जाणार
दिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते, असा चिमटा राऊत यांनी केंद्र सरकारला काढला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे,' असं राऊत म्हणाले.
मुलीच्या साखरपुड्यात राऊतांनी घेतली फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, “दुष्मन असला तरी…”
तुम्हाला शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर अटक झाली तरी आम्ही घाबरत नाही, असं उत्तर राऊत यांनी दिलं. 'दिल्लीत असताना आम्ही शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, तर परमेश्वर आम्हाला माफ करणार नाही. शिवसेनेचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेईल. कदाचित पोलीस आम्हाला अडवतील, अटक करतील, लाठ्या चालवतील किंवा मग गोळ्या घातल्या जातील. त्यापलीकडे सरकार काही करू शकत नाही,' असं राऊत पुढे म्हणाले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना दहशतवाद्यांपेक्षा वाईट वागणूक देत असल्याची टीका त्यांनी केली. 'शेतकऱ्यांना पाठिंबा देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तुम्ही कितीही पोलीस बंदोबस्त वाढवा. आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणारच. शेतकरी आणि माझ्यामध्ये केवळ एका फोन कॉलचं अंतर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्या फोनच्या तारांचे खांब कोसळले आहेत का?' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.