संजय राऊत पुन्हा मिशन मोडमध्ये; राष्ट्रपतीपदासाठी 'पॉवर'फुल्ल राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:47 AM2020-01-06T09:47:58+5:302020-01-06T09:50:13+5:30
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर संजय राऊत यांचं नवं मिशन
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून २०२२ मध्ये पवारांना राष्ट्रपती करण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असला तरीही अनेक मोठी राज्यं पक्षाला गमवावी लागली आहेत.
भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात शरद पवार आणि संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी राऊत यांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. आता राऊत देशातील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार आहेत. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरचे राष्ट्रपती पवार व्हावेत, यासाठी राऊत यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना एकत्र आणण्याचा राऊत यांचा प्रयत्न असल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.
वर्षभरापूर्वी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र गेल्या वर्षभरात परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक भाजपासाठी सोपी असणार नाही. त्यामुळेच भाजपाविरोधातील पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरुन भाजपाप्रणित एनडीएमधील मतभेद समोर आले आहेत. एनडीएमधील याच नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राऊत यांच्याकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे.