उबाठाची लाचारी महाराष्ट्रानं बघितली, ३ दिवस दिल्लीत आले अन्...; श्रीकांत शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:12 PM2024-08-09T17:12:07+5:302024-08-09T17:13:18+5:30

उद्धव ठाकरे हे मागील ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर होते, या दौऱ्यात मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे लॉबिंग करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावरच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. 

Shiv Sena MP Shrikant Shinde criticizes former Chief Minister Uddhav Thackeray over delhi tour | उबाठाची लाचारी महाराष्ट्रानं बघितली, ३ दिवस दिल्लीत आले अन्...; श्रीकांत शिंदेंचा टोला

उबाठाची लाचारी महाराष्ट्रानं बघितली, ३ दिवस दिल्लीत आले अन्...; श्रीकांत शिंदेंचा टोला

नवी दिल्ली - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि उबाठा गट स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीत येऊन थांबले. मला मुख्यमंत्री करा, असं काँग्रेसजवळ गाऱ्हाणं घालण्यासाठी ते दिल्लीत थांबले होते. आजवर महाराष्ट्राने एवढी लाचार परिस्थिती पहिली नाही असा खोचक टोला शिवसेना गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला. आज दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, उबाठाने बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून दिली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. हिंदुत्व सोडले, वैचारिक भूमिकाच राहिली नसल्याने उबाठा खासदारांनी गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी संसदेतून पळ काढला. २०१९ ला हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि २०२४ ला ज्यांच्या मतांवर हे निवडून आले त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उबाठाने केले. फक्त स्वार्थासाठी ते केवळ राजकारण करत असल्याचे कालच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. वक्फ बोर्ड विधेयकावर तुम्ही भूमिका का मांडली नाही असा सवाल त्यांनी उबाठा नेत्यांना विचारला. 

तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आता पुन्हा लोकसभेत एका विशिष्ट समाजाच्या मतांनी हे निवडून आले आणि याच समाजाच्या सुधारांसाठी संसदेत एक महत्वाचे विधेयक मांडण्यात आले तेव्हा त्यांचे सर्व नऊ खासदार पळून गेले. मुस्लीम समाजाने तुम्हाला भरभरुन मतदान केले मात्र या समाजाशी संबधित वक्फ बोर्ड विधेयकावर बोलण्याऐवजी पळून गेले. सर्व पक्षाचे नेत्यांबरोबरच शिवसेना, इतर पक्षांच्या नेत्यांनी तसेच विरोधी पक्षाने या विधेयकावर भूमिका मांडली मात्र वैचारिक गोंधळामुळे उबाठा खासदारांनी सभागृहातून पळ काढला आणि विधेयकावर बोलणे टाळले. या पळपुटेपणामुळे आपण कोणावर विश्वास ठेवला हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यायला हवे असंही खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.  

दरम्यान, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मविआतील नेते दररोज नवीन नावे घोषित करतात आणि उबाठा दिल्लीत येऊन लाचारी करतात. उबाठा मुख्यमंत्री असताना अडीच दिवस देखील मंत्रालयात गेले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी, बहिणींसाठी आणि युवकांसाठी काही केले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर टीका करतात मात्र त्यांच्या शाखांमध्ये बॅनर लावून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरतात. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसमावेश विचार करणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. 
 

Web Title: Shiv Sena MP Shrikant Shinde criticizes former Chief Minister Uddhav Thackeray over delhi tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.