महाराष्ट्र निवडणूक 2019: एनडीएच्या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण नाही; भाजपा नेतृत्वाकडून युती तोडल्याचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:03 PM2019-11-15T18:03:29+5:302019-11-15T18:06:27+5:30
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तापेचामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये असलेला बेबनाव संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी दिल्लीत पुन्हा उफाळून आला आहे. युती तोडण्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले होते. आता रालोआ घटकपक्षांच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपनेदेखील त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला अद्याप निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी रालोआ बैठकीचे निमंत्रण अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. भाजपने महाराष्ट्रात युती संपल्याची अद्याप घोषणा झाली नाही. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत विरूद्ध भाजपाध्यक्ष अमित शहा अशी जुगलबंदी रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. युती नसली तरी तशी घोषणाही नाही. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेला रालोआ बैठकीचे निमंत्रण न पाठवून भाजपनेदेखील 'युती तुटली' असाच संदेश दिला आहे.