Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय, अन्यथा...”; बंडखोरांनी पुन्हा सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:59 PM2022-06-29T15:59:47+5:302022-06-29T16:01:12+5:30
Maharashtra Political Crisis: आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे बंडखोर आमदारांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले आहे.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यातच बुधवारी सकाळी बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचा पक्षच जवळचा वाटत असल्याची टीका केली.
दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचे नाही. महाविकास आघाडीने आपली नाटके आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की, आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीवेळी केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तरी हे सरकार पडेल, ३९ लोक तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसे बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेना नेत्यांना असलेली वेडी आशा आहे, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय
आम्ही त्यांना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार आणि त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) अधिक प्रिय आहेत. हे सर्वांना मान्य होणारे नाही. त्यामुळे यापुढे काही चर्चेची अपेक्षा आहे असे वाटत नाही. आता वेळ निघून गेलेली आहे आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखले आहे. त्यांनाच विचारा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवले आहे. आमची कार्यालये फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसे परतणार, अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली.