“गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं”; गुवाहाटीत समर्थनार्थ बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:27 PM2022-06-27T20:27:31+5:302022-06-27T20:29:27+5:30
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असल्याचे पाहायला मिळत असून, आता थेट आसाममध्ये समर्थनाचे बॅनर लागले आहेत.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना राज्यभरातून पाठिंबा वाढतानाही दिसत आहे. आता थेट गुवाहाटीमध्येच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अन्य काही आमदारांसह एकाएकी मुंबई सोडून गुजरातमधील सूरत येथे गेल्याची माहिती धडकली आणि राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. गेल्या आठवड्याभरापासून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाखोरीनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली. हळूहळू करत सुमारे ३८ ते ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. राज्यात यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले. तर काही आमदारांना त्यांच्या भागातून समर्थन मिळाले. मात्र, आता थेट गुवाहाटीतच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे समोर आले आहे.
गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं
गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं, असे लिहिले आहे. तसेच हिंदुत्व फॉरएव्हरचा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. हे बॅनर शिव नारायण, बाळा मुदलीवार अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईत राहत असून, मूळचे आसामचे आहेत. तसेच या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
दरम्यान, दिवसभरातील एकूण घडामोडींनंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची गरज आताच्या घडीला आहे, असे वाटत नाही. तसेच भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.