“थोडं थांबा, ठाकरे कुटुंबाच्या जवळचे आणखी दोन आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात येतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:15 PM2022-06-27T21:15:02+5:302022-06-27T21:16:22+5:30
आणखी एक ते दोन आमदार शिंदे गटात सामील होऊ शकतात, असा दावा करण्यात येत आहे.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना राज्यभरातून पाठिंबा वाढतानाही दिसत आहे. यातच आता आणखी दोन आमदार शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, असा दावा बंडखोर आमदारांच्या वतीने करण्यात आला आहे.
अलीकडेच कुणालाही थांग पत्ता न लागू देता राज्याचे आणखी एक मंत्री उदय सामंत एकाएकी शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक बैठकांमध्ये सहभागी झालेले आणि शिंदे गटात सामील होणार नाही, असा दावा करणारे उदय सामंत यांच्या गुवाहाटीतील प्रवेशांना अवघ्या राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी आणखी एक ते दोन आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सूतोवाच केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटात सामील होणारे पुढील आमदार ठाकरे कुटुंबाच्या जवळचे असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दोन आमदार ठाकरे कुटुंबाच्या जवळचे
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटात सामील होणारे आमदार ठाकरे कुटुंबाच्या जवळचे असू शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र, नजीकच्या काळात शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांमध्ये बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राहुल पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. तेही नॉट रिचेबल होते. मात्र, खुद्द राहुल पाटील यांनी समोर येत, मी मुंबईतच आहे. पक्षाशी गद्दारी करणार नाही, असे सांगितले.
गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले. तर काही आमदारांना त्यांच्या भागातून समर्थन मिळाले. मात्र, आता थेट गुवाहाटीतच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये गर्व से कहो हम हिंदू हैं, शिंदे साहब हम आपके साथ हैं, असे लिहिले आहे. तसेच हिंदुत्व फॉरएव्हरचा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. हे बॅनर शिव नारायण, बाळा मुदलीवार अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईत राहत असून, मूळचे आसामचे आहेत.