Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचे आता मुक्काम पोस्ट गोवा; गुवाहाटीचं ‘हाटिल’ सोडलं, थोड्याच वेळात ‘टेक ऑफ’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:13 PM2022-06-29T17:13:07+5:302022-06-29T17:13:54+5:30
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून रवाना झाले असून, ते आता गोव्याला जाणार आहेत.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच बुधवारी सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेलवरून रवाना झाले आहेत. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते गोव्यात दाखल होणार आहेत.
आठवडाभराच्या सत्तानाट्यानंतर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यानंतर लगेचच बुधवारी सकाळी राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश ठाकरे सरकारला दिले. यानंतर बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडण्याचा निर्णय घेतला. आता सर्व बंडखोर आमदार गोव्याला जाणार आहेत.
गोवा मार्गे मुंबईत दाखल होणार
शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. तसेच सर्व बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, आम्ही मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे पन्नास आमदार आहेत. शिवसेना ४० आणि १० समर्थक आहेत. यामुळे फ्लोअर टेस्ट किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया असेल त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. लोकशाहीत कायदा, संविधान आणि नियमांच्या पुढे जाऊन कोणी काहीही करू शकत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही मुंबईत आल्यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाणार आहोत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.