“कॅन्सर झाला, आधाराचा हात हवा होता, पण पक्षाने विचारपूसही केली नाही”; यामिनी जाधवांचं शल्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:45 PM2022-06-24T18:45:23+5:302022-06-24T18:45:38+5:30
गेल्या ४२ वर्षांपासून शिवसेनेत आहोत. किंबहुना शिवसैनिक म्हणूनच जग सोडू. पण... आपल्या व्हिडिओत नेमके काय म्हणाल्या यामिनी जाधव? वाचा...
गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडूनही बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार यामिनी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
भायखळा येथील आमदार यामिनी जाधव यांनी गुवाहाटीवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये, गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांचा जो उद्रेक सुरू आहे, तो आम्ही समजू शकतो. मात्र, आम्हीही शिवसैनिक आहोत. यापुढेही शिवसैनिकच राहणार आहोत. किंबहुना हे जगही शिवसैनिक म्हणून सोडणार आहोत. यशवंत जाधवसाहेब ४३ वर्ष शिवसेनेत आहेत. ते वयाच्या १७ व्या वर्षापासून शिवसेनेसाठी काम करत आहेत. या काळात अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकटे मोठ्या प्रमाणात आली. मात्र, तरीही पक्षाबाबत वेगळा विचार त्यांनी कधी केला नाही, असे यामिनी जाधव म्हणाल्या.
यामिनी जाधवांनी सांगितला भावपूर्ण प्रसंग
गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून माझ्यावर एक वादळ आले. कॅन्सर नावाचे. ज्यावेळेस आम्हाला, आमच्या कुटुंबाला समजले, तेव्हा सगळे जण खचून गेले. या कर्करोगाच्या आजाराची माहिती आपल्या पक्षाला द्यावी लागते, ती यशवंत जाधव यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिली होती. एक महिला आमदार म्हणून माझी एक अपेक्षा होती की, काही नेते घरी विचारपूस करायला येतील. आपल्या महिला आमदार कर्करोगाने त्रस्त आहेत, हीच गोष्ट मन हलवून टाकणारी होती. मी स्वतः कॅन्सर या शब्दाने कोलमडून गेले होते. आमच्या कुटुंबाने तसेच भायखळा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे आजही आभारच मानते. एक अपेक्षा होती की, विचारपूस केली जाईल. एक आधाराची धाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांना मिळेल. पण तसे झाले नाही, असे यामिनी जाधव यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
मरणासन्न अवस्था झाल्यावरच पक्षनेते आले असते का?
किशोरीताई माझ्या घरी आल्या. दोन तास माझ्याशी बोलल्या. कर्करोगाविषयी घ्यायची काळजी, अन्य अनेक गोष्टी सांगितल्या. याशिवाय अध्यात्मिक सूचनाही त्यांनी केल्या. हे कर, म्हणजे तुला बरे वाटेल. मात्र, ज्यांच्याकडून खरी अपेक्षा केली होती, त्यांच्यापैकी कुणीही अथवा कोणत्या नेत्याने साधी विचारपूसही केली नाही. २०१२ पासून मी नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कर्करोग झाल्याचे पाहिले आहे. अनेकदा रुग्णालयात जाऊन भेटही घेतली आहे. या कर्करोगाच्या आजारात माझी मरणासन्न अवस्था व्हायला हवी होती का आणि मगच पक्षनेते आले असते का, असा भावनिक प्रश्न यामिनी जाधव यांनी यावेळी बोलताना केला.
आठ महिन्यापासून कुटुंब अनेकविध अडचणींचा सामना करतेय
गेल्या आठ महिन्यापासून माझे कुटुंब अनेकविध अडचणींचा सामना करत आहे. त्यातही कुणाचा आधार नाही, कुणाचे मार्गदर्शन नाही, कोणत्या चांगल्या सूचना आम्हाला मिळाल्या नाहीत. आम्ही दोघेच कुटुंबासाठी हातपाय मारत होतो. आणि मगच या निर्णयाला येऊन पोहोचलो. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. बऱ्याच दिवसांपासूनची ही प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होत आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांनी इतिहास घडवलेला आहे
आमच्या कठीण काळात भायखळा विधानसभा मतदारसंघाने आम्हाला खूप समजून घेतले. किंबहुना एक इतिहासच शिवसैनिकांनी घडवलेला आहे. त्याच शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेविरोधात कधीही जाणार नाहीत. बेईमानी कधीही करणार नाहीत. काहीतरी कारण त्यामागे आहे, ते शोधण्याची आज गरज आहे. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याकडून प्रेमाचा जय महाराष्ट्र!!!