Maharashtra Political Crisis: “२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 02:03 PM2022-07-22T14:03:45+5:302022-07-22T14:05:21+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले.
नवी दिल्ली: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. बंडखोर आमदार त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत.
यातच आता काही दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांपैकी एक राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करणे आवश्यक आहे, असे मत बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. शिवसेनेत फूट पडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकांमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा बंडखोर नेत्यांनी उपस्थित केला होता.
उद्धव हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत
उद्धव ठाकरे यांचा मी आदर करतो, मात्र आपण वास्तववादी असले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. उद्धव हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत, असे सांगितल्याचे शेवाळे म्हणाले. अनेक मतदारसंघांत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी शिवसेनेने युती करणे, हा अत्यंत गुंतागुंतीचा मामला आहे. लोकसभा निवडणुकीत यूपीएचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे आम्हाला कदापि मान्य होणारे नाही, असेही शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील बहुसंख्य नेते भाजपशी युती करण्याच्या बाजूने आहेत आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल शेवाळे यांनी थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले. त्या वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी काम केले. युतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना वरळीच्या मतदारांनी निवडून दिले आहे. आशीर्वाद दिला. पण त्यांची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दाराची व्याख्या होऊ शकते का? हे तपासून पाहावे लागेल. गद्दार कोण याचे उत्तर वरळी विधानसभेतील मतदार येत्या निवडणुकीत देतील, असा इशारा राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.