"पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 07:51 AM2021-10-09T07:51:31+5:302021-10-09T07:52:06+5:30

काश्मीरमधील घटनांवरुन शिवसेनेचा टीकेचा बाण. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत, ईडी-आयटीत दिसतं तसं कश्मीर खोऱ्यातही दिसावं : शिवसेना 

shiv sena saamna editorial criticize bjp government over jammu kashmir issues terrorist | "पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही"

"पोकळ भाषणे, निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही"

Next
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत, ईडी-आयटीत दिसतं तसं कश्मीर खोऱ्यातही दिसावं : शिवसेना 

सध्या भाजप सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱयांत निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार, भाजपचे अस्तित्व दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पाटर्य़ांत, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱयातही दिसावे. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शांत’ करण्यासाठी ‘खासगी आर्मी’ उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

कश्मीर खोऱ्यात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल, असंही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱयात दिसत नाहीत. कश्मीर खोऱयात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळय़ा ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू आहे. श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळय़ा घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱया मुस्लिम अधिकाऱयांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे.

उरल्यासुरलेल्या पंडितांचंही पलायन
नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर 370 कलम हटवले. 370 कलम हटवल्याने खोऱ्यातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला. कश्मीर खोऱयातील लोक जीव मुठीत धरूनच जगत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत. हिंदुत्वाचा फुका अभिमान मिरवता, पण कश्मीरातील हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. 

फुटीरतावाद्यांना जोर
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधड्य़ा कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही. पुन्हा येथे नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. नोटाबंदीमुळे अमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा बसेल असे तेव्हा सांगितले. गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानातील अमली पदार्थांचा व्यवहार शंभर पटीने वाढला. 

काश्मीर प्रश्नाचे नको तितके राजकारण?
एकंदरीत कश्मीरबाबतच्या धोरणांचा साफ फियास्को झाला आहे. कश्मीर प्रश्नाचे नको तितके राजकारण झाले. कश्मीर हा देशातील मतपेटीचा विषय बनला. ‘‘पाकव्याप्त कश्मीरही हिंदुस्थानला जोडू’’ असे सांगून मते मिळवली गेली, पण आपल्या कश्मीरात हिंदुस्थानवाद्यांना जगणे कठीण झाले आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी कश्मीरप्रश्नी आरपारची लढाई करावी, असे देशातील जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. कारण कश्मीर खोरे रोज निरपराध्यांच्या रक्ताने भिजत आहे. त्यांच्या किंकाळ्य़ा व आक्रोशाने थरारत आहे. कायद्याचे राज्यदेखील खोऱयात अस्तित्वात नाही. इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाडय़ा आवळता येतात, पण कश्मीर खोऱयातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही. मुंबईतील ‘एनसीबी’च्या धाडसत्रात भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्याचे समोर आले. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणाही भाजपबरहुकूम चालत आहेत. या तपास यंत्रणांचा ताबा जणू भाजपने घेतला आहे. 

Web Title: shiv sena saamna editorial criticize bjp government over jammu kashmir issues terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.