...तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल; देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीनं समजून घ्यावं - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:36 AM2021-10-13T07:36:09+5:302021-10-13T07:36:38+5:30

कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे हे भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही : शिवसेना

shiv sena saamna editorial criticize bjp government over pakistan china on border called east india company | ...तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल; देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीनं समजून घ्यावं - शिवसेना

...तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल; देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीनं समजून घ्यावं - शिवसेना

Next
ठळक मुद्देकश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे हे भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही : शिवसेना

चीननेपाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या ‘फेऱ्या’ मोजत बसलो आहोत, असं शिवसेनेने म्हटले आहे. 

पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे.

पाकिस्तानचं काय वाकडं केलं?
 बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे. उलट अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे व त्यामुळेच कश्मीर खोऱ्यांतील हिंसाचार वाढला आहे. मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. 

... तेच चीनच्या सीमेवर
इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत. पाकिस्तानातून घुसखोरी सुरूच आहे व कश्मीर खोऱ्यातील स्थिती तप्त पाण्यासारखी खदखदत आहे. कश्मीर खोऱ्यातील 370 कलम हटवले खरे, पण सैन्य हटविण्यासारखी स्थिती अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. देशात किसानही सुरक्षित नाही व जवानही बलिदानच देत आहेत. जे कश्मीरात तेच चीनच्या सीमेवर. पूर्व लडाखमध्ये घुसविलेले सैन्य माघारी घ्यायला चीन तयार नाही. दोन देशांतील चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत, पण तोडगा निघायला तयार नाही. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने तळ ठोकून आहे. 

Web Title: shiv sena saamna editorial criticize bjp government over pakistan china on border called east india company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.