पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना म्हणाली, "माकडांच्या हाती..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:43 AM2022-03-11T08:43:13+5:302022-03-11T08:43:41+5:30

पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये : शिवसेना

shiv sena saamna editorial criticize bjp iver five states elections up election result 2022 yogi adityanath priyanka gandhi goa result | पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना म्हणाली, "माकडांच्या हाती..." 

पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना म्हणाली, "माकडांच्या हाती..." 

googlenewsNext

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पंजाब वगळता अन्य चारही राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. निकालानंतर भाजपनं आपलीच लाट असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. एकीकडे भाजपचा जल्लोष सुरू असताना मात्र, दुसरीकडे शिवसेनेने त्यांच्यावर टीकेचा बाण सोडत पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते असं म्हणत विजयाचे अजीर्ण होऊ नये असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही. अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये!, असे म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपला टोला लगावला आहे.

"उत्तर प्रदेशात तरी ‘ऑपरेशन गंगा’ सफल"
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत व निदान उत्तर प्रदेशात तरी ‘ऑपरेशन गंगा’ सफल झाले आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड अशा पाच राज्यांतील निकालांनी भारतीय जनता पक्षाला उत्साहाचे भरते येणे साहजिक आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यांत भाजपने सत्ता राखली आहे. संपूर्ण केंद्रीय सत्ता, देशभरातील भाजपचे बळ, प्रचंड धनसत्ता, हाताशी असलेली अमर्याद साधनसंपत्ती या बळावर भाजपला विजय मिळाला नसता तरच नवल होते. भाजपच्या विजयाचे विश्लेषण थोडक्यात करायचे तर जिथे भाजपला पर्याय होता, तिथे मतदारांनी भाजपला पराभूत केले. पंजाबातील ‘आप’चा मोठा विजय हे त्याचे उदाहरण. पंजाबात काँग्रेसचे राज्य होते, ते त्यांनी स्वतःच घालविले. पंजाबच्या जनतेला ‘आप’च्या रूपाने एक पर्याय मिळाला व सत्ताधारी काँग्रेससह भाजप, अकाली दलाचा दारुण पराभव तिथे झाला. 

"... पण गोव्यात तसं झालं नाही" 
गोव्यातील निकाल पाहता भाजपने जवळजवळ बहुमत गाठले आहे. काँग्रेसचा गोव्यात चांगला जम असतानाही
काँग्रेस बारा जागांवरच रखडून पडली. भाजपला २० पर्यंत मजल मारता आली. पणजीत उत्पल पर्रीकर हे पराभूत झाले. बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता पणजीची जनता बाबूश महोदयांना कायमचे घरी पाठवील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गोव्यात आप, तृणमूल काँग्रेसने पसारा मांडला, त्याचा फायदा शेवटी भारतीय जनता पक्षालाच झाला, पण संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे. योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपने सगळ्यांना चकीत केले आहे. 

"तरी पुन्हा भाजपला मतदान"
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार 180 चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. उत्तर प्रदेशात विकासापेक्षा जाती-पोटजातीचेच राजकारण जास्तच चालत आले आहे. या वेळी ‘हिजाब’ वादाच्या बरोबरीने जात-पातही चालविण्यात भाजप यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या प्रवाहात शेकडो प्रेते वाहून जाताना लोकांनी पाहिली, पण त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले.

"प्रचार काळात प्रत्यय आलाच"
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपकडून शिकावे, पण एक मात्र नक्की, निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती, प्रचार यंत्रणा, पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच.

Web Title: shiv sena saamna editorial criticize bjp iver five states elections up election result 2022 yogi adityanath priyanka gandhi goa result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.