आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 07:28 AM2021-10-14T07:28:15+5:302021-10-14T07:28:50+5:30

सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खातंय, शिवसेनेचा निशाणा

shiv sena saamna editorial slams bjp government over price hike fuel price india | आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेची केंद्रावर टीका

आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेची केंद्रावर टीका

Next
ठळक मुद्देसरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खातंय, शिवसेनेचा निशाणा

पोटाची खळगी कशी भरायची, आधीच ‘कोरोनाचा मार’ त्यात हा दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था या वर्षी 9.5 टक्के दराने वाढणार, 2022 मध्ये विकास दरात हिंदुस्थान जगाला मागे टाकणार, असे आणखी एक ‘गाजर’ दाखवले आहे. हीदेखील एक प्रकारची आकडेबाजीच आहे, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका. सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलही, पण वास्तवातील दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे त्याचे काय? 2022 मध्ये हिंदुस्थानचा विकास दर जगात सर्वाधिक होणार असेल तर त्याचा आनंद सगळय़ांनाच होईल. पण आता सामान्य माणसाला प्रचंड महागाईचे जे चटके बसत आहेत त्याचे काय? असा सवालही शिवसेनेने केला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीकेचे बाण सोडले आहेत. 

काय म्हटलेय अग्रलेखात ?
केंद्रातील सरकारने आता असे जाहीर केले आहे की, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घटला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 5.3 टक्के होता. आता तो 4.45 टक्क्यांवर आला आहे. सरकारच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस’ने ही टक्केवारी जारी केली आहे. एप्रिल 2021 नंतरचा हा सर्वात कमी दर आहे, असेही सांगण्यात आले आहे. शिवाय खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत असाही सरकारचा दावा आहे. त्यामुळे खाद्य महागाई 3.11 टक्क्यांवरून 0.68 टक्के एवढी घसरली आहे, असेही सरकारचे म्हणणे आहे. आता सरकारच म्हणत आहे म्हणजे कागदोपत्री महागाई कमी झाली असेच म्हणावे लागेल. सरकारी कागदावर ही आकडय़ांची तलवारबाजी नेहमीच सुरू असते. 

सगळी गंमतच 
पुन्हा हे आकडे सरकारच्या सोयीनुसार बदलत असतात. म्हणजे सरकारला वाटते तेव्हा या आकडय़ांच्या फुग्यांमध्ये हवा भरली जाते किंवा काढली जाते. त्याचा वस्तुस्थितीशी ताळमेळ असायलाच हवा असे काही नसल्याने अनेकदा हे सरकारी आकडे ऐकले की, सामान्य माणसाला ‘आकडी’च येत असते. आतादेखील सामान्य माणूस महागाई आणि रोजच्या इंधन दरवाढीच्या वणव्यात होरपळत असताना केंद्र सरकार महागाई दरात घट झाली, खाद्य महागाई कमी झाली असे दावे करीत आहे. सगळी गंमतच सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज नवनवे विक्रम करीत आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम भाववाढीवर
इंधन दरवाढीचा सगळय़ात मोठा परिणाम भाववाढीवर होत असतो हे साधे गणित आहे. त्यामुळे बाजारात सर्वच वस्तूंचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत. खाद्यतेलाने तर मध्यंतरी भाववाढीचा उच्चांक गाठला होता आणि गृहिणींचे बजेट कोलमडून टाकले होते. इतरही अन्नधान्याच्या किमती वाढलेल्याच आहेत. भाजीपाला, फळफळावळदेखील स्वस्त व्हायला तयार नाही. त्यात मागील महिन्यातील ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर यामुळे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीन, कापूस, डाळी, कडधान्ये उद्ध्वस्त झाली आहेत. केळी, द्राक्षे, ऊस आणि इतर फळबागाही नष्ट झाल्या. भाजीपाला आडवा झाला. या परिस्थितीमुळे भाज्या, फळे यांचे बाजारातील भाव वाढले आहेत. 

'अच्छे दिन आले हो'चा उद्घोष
 सामान्य माणसाचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे आणि सरकार म्हणत आहे की, महागाईचा दर घटला, खाद्य महागाई अवघ्या 0.68 टक्क्यांवर आली. असे जर असेल तर मगबाजारात जी दरवाढ आणि महागाई दिसते आहे ते काय आहे? सध्याच्या इंटरनेट मायाजालाच्या भाषेत हा महागाईचा वणवा ‘आभासी’ आहे आणि लोक, विरोधी पक्ष उगाच त्याचा बागुलबुवा उभा करीत आहेत असे केंद्रातील सरकारला म्हणायचे आहे का? रोजचा दिवस कसा ढकलायचा, पोटाची खळगी कशी भरायची, आधीच ‘कोरोनाचा मार’ त्यात हा दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. आकडय़ांच्या रेघोटय़ा मारीत ‘अच्छे दिन आले हो’चा उद्घोष करीत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था या वर्षी 9.5 टक्के दराने वाढणार, 2022 मध्ये विकास दरात हिंदुस्थान जगाला मागे टाकणार, असे आणखी एक ‘गाजर’ दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजात ही ‘भविष्यवाणी’ करण्यात आली आहे. हीदेखील एक प्रकारची आकडेबाजीच आहे. 

Web Title: shiv sena saamna editorial slams bjp government over price hike fuel price india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.