"बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही...,"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:30 AM2021-12-31T09:30:07+5:302021-12-31T09:30:47+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनेचा हल्लाबोल.

shiv sena saamna editorial slams karnataka cm basavaraj bommai chatrapati shivaji maharaj statue bengaluru | "बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही...,"

"बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही...,"

Next

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सर्व मराठी जनतेमध्ये रोष पसरला होता. कर्नाटकातील या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला होता. परंतु ही गोष्ट छोटी असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी केले होते. दरम्यान, शिवसेनेने बोम्मई यांच्यावर हल्लाबोल करत "श्रीमान बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती व तुमचाही मियाँ बोम्मई खान बनला असता," असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. या ३८ पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमचेच सडविण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे पोटतिडकीने पाहायला हवे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात?
भारतीय जनता पक्षाने आपली विश्वासार्हता साफ गमावली आहे. ठाम अशी भूमिका नाहीच. कधी कशी टोपी फिरवतील याचा नेम नाही. एक तर त्यांच्या भूमिका राज्याराज्यानुसार बदलत असतात, पण न्याय-अन्यायाच्या व्याख्याही बदलत असतात. या ‘दहातोंडी’पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बंगळुरूत झालेली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना. त्या विटंबनेनंतर कर्नाटक सरकारने सुरू केलेली दडपशाही हा धक्कादायक प्रकार आहे. प्रकरण शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे व विटंबनेचा धिक्कार करणाऱ्या मराठीजनांवरील अत्याचारांचे आहे. कर्नाटकात भाजपचे शासन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. हे सर्व प्रकरण अद्याप विझलेले नाही, तर त्यात तेल ओतण्याचे काम कर्नाटकचे बोम्मई सरकार करत आहे. 

'यास काय म्हणायचे?'
१६ डिसेंबरला बंगळुरूत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केली. हे अज्ञात समाजकंटक म्हणजे कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे गावगुंड होते. त्या घटनेचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. सीमा भागातील मराठी जनतेने शिवराय पुतळा विटंबनेचा रस्त्यावर येऊन निषेध केला. हा लोकांचा संताप आणि चिड होती. बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. तेव्हा त्यांना कानडी पोलिसांनी बेदम मारहाण करून तुरुंगात पाठवले. आजपर्यंत त्यांना जामीन तर मिळू दिलेला नाहीच, पण या ३८ पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमचेच सडविण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. या अतिरेकास काय म्हणायचे, ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच स्पष्ट करावे. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोहासारखा अपराध झाला?

'साधा कागदी निषेधही नाही'
शिवराय होते, जन्मले व मोगलांविरुद्ध लढले म्हणून तुमची ही आजची मिजास सुरू आहे. शिवरायांचा कर्नाटकात अपमान झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उमटले. म्हणून या सर्व लोकांवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले नाहीत. कारण महाराष्ट्राचे शिवराय प्रेम बावनकशी आहे, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते राज्यातील मऱ्हाटी रक्ताच्या भाजप पुढाऱ्यांचे. त्यांची बेळगावसह सीमा भागाविषयीची भूमिका ही बुळबुळीत आहे. ती गुळगुळीत असती तरी एकवेळ निभावले असते, पण सीमा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून जे २० लाख मराठी बांधव लढत आहेत, मरत आहेत त्यांचे पाय खेचण्याचेच उद्योग महाराष्ट्रात बसून हे लोक करीत आहेत. सीमा भागातील अत्याचाराविरोधात हे लोक कधी साधा कागदी निषेध करत नाहीत. पण इतर प्रकरणी नुसता थयथयाट करतात.

'मोगलाई वाढतेय'
भाजप काळात ही अशी मोगलाई वाढत चालली आहे व त्यांची मोगलाई हिंदुत्वाचे नकली मुखवटे घालून फिरत आहे. मराठी तरुणांना देशद्रोही ठरविताना बोम्मई सरकारने आणखी एक अफझलखानी विडा उचलला आहे. तो म्हणजे सीमा भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा. बोम्मई हे अफझलखानी कृत्य खरेच करणार असतील तर ती भाजपच्या नकली हिंदुत्वाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरावी.

Web Title: shiv sena saamna editorial slams karnataka cm basavaraj bommai chatrapati shivaji maharaj statue bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.