"ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली, त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहताना जगाने पाहिलं" 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:29 AM2021-12-15T06:29:24+5:302021-12-15T06:29:53+5:30

शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य, त्यामुळे फक्त ‘अफू’ वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नये : शिवसेना

shiv sena saamna editorial slams pm modi over kashi yatra compared ganga with corona pandemic situation | "ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली, त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहताना जगाने पाहिलं" 

"ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली, त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहताना जगाने पाहिलं" 

googlenewsNext

'महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार हा वेगळा विषय. ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी काल डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्या वेळी तेथे जायला हवे होते,' असे म्हणत शिवसेनेने (ShivSena) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो. मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात, असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधानांवर निशाणा साधला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर टीकेचा बाण सोडला.

काय म्हटलंय अग्रलेखात? 
पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची तीर्थयात्रा हा एक प्रकारे राजकीय सोहळाच ठरतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे.

... देवांनाही ठाऊक असेल
मोदी यांनी काशीच्या भूमीवरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा ‘शंख’ फुंकला. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच असल्याची टीका आता होत आहे. सध्या सगळय़ांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात असेल.  स्वातंत्र्यानंतर प्रथम सोमनाथाचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांनी घडवून आणला. हिंदुस्थानातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचे कौतुक व्हायला हवे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवे. काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल. मोदी यांच्या आधी अनेक हिंदुत्वप्रेमी खासदार तेथे येऊन गेले. काशीचा विकास करणे त्यांच्याही मनात होते, पण ते सर्वजण पंतप्रधान नसल्यामुळे काशी विश्वनाथ धाम उपेक्षित राहिले.

धर्म म्हणजे अफूची गोळी
मंदिरे किंवा धार्मिक स्थळे ही अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त ‘अफू’ वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवायला हवी. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे.

मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत. हिंदुस्थानास मांगल्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि अध्यात्माचा महान वारसा लाभला आहे. शतकापासून या भूमीने महान संस्कृतीचा प्रवाह खळखळत ठेवला आहे आणि ‘वसुधैव कुटुंबकम’च्या संकल्पातून संपूर्ण जगाच्या कल्याणाचा संदेश दिला आहे. आमच्या संस्कृतीची मुळे इतकी घट्ट रुजली आहेत की, अनेक वादळे, हल्लेदेखील ही मुळे नष्ट करू शकले नाहीत. या मुळांतून आपल्या संस्कृतीचा वृक्ष बहरला आहे. देशात आज राजकीय वातावरण बिघडले आहे. राज्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. गोंधळाची स्थिती आहे. महामारीने लोकांचे जीवन अशांत केले आहे. अशा वेळी धर्म आणि अध्यात्मच जगण्याची ऊर्जा देत असते. 

Web Title: shiv sena saamna editorial slams pm modi over kashi yatra compared ganga with corona pandemic situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.