शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:05 PM2021-02-02T14:05:13+5:302021-02-02T14:07:36+5:30
गाझीपूर सीमेवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली टिकैत यांची भेट
शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला होता. तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांपेक्षा वरची आहे, असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गाझीपूर येथे भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचं शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये," असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
Shiv Sena leaders including party MPs Arvind Sawant and Sanjay Raut meet Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait at Ghazipur (Delhi-Uttar Pradesh) border. pic.twitter.com/KC4ZZDhJPG
— ANI (@ANI) February 2, 2021
We spoke to Tikait sahib, gave our message & expressed solidarity. Govt should speak to farmers in a proper way. Ego would not help run the country: Shiv Sena MP Sanjay Raut at Ghazipur border pic.twitter.com/8pbPSH39js
— ANI (@ANI) February 2, 2021
यापूर्वीही सरकारवर साधला निशाणा
"दिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते," असा चिमटा राऊत यांनी यापूर्वी बोलताना केंद्र सरकारला काढला. "शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे," असं राऊत म्हणाले.
"दिल्लीत असताना आम्ही शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, तर परमेश्वर आम्हाला माफ करणार नाही. शिवसेनेचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेईल. कदाचित पोलीस आम्हाला अडवतील, अटक करतील, लाठ्या चालवतील किंवा मग गोळ्या घातल्या जातील. त्यापलीकडे सरकार काही करू शकत नाही," असं राऊत यापूर्वी म्हणाले होते.