Maharashtra Political Crisis: “हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:37 PM2022-07-04T14:37:07+5:302022-07-04T14:38:13+5:30
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवती निवडणुका होतील, असे सूचक विधान केल्यावर संजय राऊत यांनीही री ओढली आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नव्या सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार तात्पुरते असून, गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातही निवडणुका लागतील, असा मोठा संजय राऊतांनी केला.
जोपर्यंत मुंबई महाराष्टात शिवसेना मजबूत आहे. तोपर्यंत दिल्लीकरांचे इरादे सफल होणार नाहीत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगतो. तसेच सध्या महाराष्ट्रात असलेली व्यवस्था ही तात्पुरती आहे. ती फार काळ टिकणार नाही. भाजपाला शिवसेना फोडायची होती. त्यांनी ती फोडून दाखवली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत
कदाचित गुजरातच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातही मध्यावती निवडणुका लागू शकतात. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपने केली आहे. आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीने सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले. तसेच आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलो आहोत हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि तो राहील. १६ आमदारांच्या अपत्रातेबाबत याचिका प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणे घटनाबाह्य आहे. ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय घेईल. त्यानंतर हा निर्णय घ्यायला हवा होता. स्वार्थासाठी गुडघे टेकू नका अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ नाही. ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. आज विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल. पण महाराष्ट्रात, ग्रामीण भागात शहरा शहरात शिवसेना तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणजे शिवसेना कमजोर झाली असे म्हणणे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा अपमान आहे. राज्यातील जनता बाळासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे.