“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:10 PM2022-06-14T12:10:34+5:302022-06-14T12:11:24+5:30

Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली.

shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi govt at ayodhya visit | “एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं”

“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं”

Next

अयोध्या: राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नियोजित अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी अयोध्येला आदित्य ठाकरेंसोबत गेले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांसह अनेकांना अयोध्या दौऱ्यावर नेण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. यातच, भाजप आणि केंद्रावर मोदी सरकारवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे. प्रभू श्रीरामाने द्वेषाचे नाही समन्वयाचे राजकारण केले, अशी टीका केली आहे. 

सध्याच्या काळात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे दुषित झाले आहे. पूर्वीच्या काळी विरोधकांशी अदबीने वागण्याची संस्कृती होती. पंडित नेहरुंपासून ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यंत ही संस्कृती जपली गेली. दुर्दैवाने आजच्या राजकारणातील सहिष्णुता संपली आहे. विरोधी विचारांच्या आणि धर्माच्या लोकांना चिरडले जात आहे. हे प्रभू श्रीरामांचे हिंदुत्व नाही, असे संजय राऊत म्हणाले. अयोध्येत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

प्रभू श्रीरामांनी कधी द्वेषाच राजकारण केले नाही

प्रभू श्रीरामांनी कधी द्वेषाच राजकारण केले नाही. प्रसंगी वनवास पत्कारला. त्यांनी अहंकारी रावणाला संपवले, हे त्यांचे हिंदुत्व होते. पण आज देशात जे आपल्या विचारांचे नाहीत, आपल्या धर्माचे नाहीत, त्यांच्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. जे सत्य बोलतात, त्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवायचे, चौकशीला बोलवायचे, हे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व हे खूप व्यापक आहे, असे संजय राऊत म्हणाले. प्रभू श्रीरामांनी समन्वयाचे राजकारणे केले. समन्वयाने अहंकार दूर करणे हा हिंदुत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून समन्वयाचे हिंदुत्व आणि संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श असल्याचे सांगण्याचे कारण नाही. अयोध्येतील राम मंदिर आंदोलन म्हणा किंवा हिंदुत्वासाठीची अन्य पातळ्यांवरील लढाई म्हणा, यामध्ये शिवसेनेचा खारीचा का होईना वाटा आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. आमचे हिंदुत्व हे एखाद्या धर्माच्या प्रमुखांवर चिखलफेक करणारे किंवा धर्माचा द्वेष करणारे नाही. राज्यकर्त्यांनी सूडाच्या आणि बदल्याच्या भावनेने राज्य चालवू नये, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi govt at ayodhya visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.