“आपण कितीही हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असले पाहिजे”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:27 PM2021-12-06T14:27:37+5:302021-12-06T14:28:32+5:30
भाजपवाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
नवी दिल्ली: नाशिक येथील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार तथा लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या काही कर्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. या घटनेचा अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, आपण कितीही हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असले पाहिजे, असे म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्राने देशाला दिलेले आहेत. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. कोट्यवधी लोकांच्या भावना या युगपुरुषांशी जोडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठले होते. आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी भान असले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
आपल्याकडे अनेकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले जाते
नागालँडमध्ये झालेल्या घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, आपल्याकडे अनेकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले जाते. फक्त गोळ्या घातल्या जात नाही इतकेच. आमच्या मागेसुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावत छळ केला जातोच. फक्त त्यांच्या हातात बंदुका नाहीत, वेगळ्या प्रकारे छळ केला जातो. अशाप्रकारे राज्य करण्याची ही प्रवृत्ती आणि विकृती वाढत चालली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रेम आणि सद्भाव ठेवतो. शरद पवार यांनी नाशिकमध्ये सावरकरांवर केलेले पहिलं भाषण नाही. त्यांनी बारामतीतही विद्वतापूर्ण भाषण केले होते. भाजपला वीर सावरकरांचा शौर्य का दिसत नाही. त्यांना ते भारतरत्न का देत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.