Lakhimpur Kheri Incident: “खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:18 PM2021-10-07T13:18:54+5:302021-10-07T13:21:18+5:30
Lakhimpur Kheri Incident: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri Incident) येथे झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यातच या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतः दखल घेत याचिका दाखल करून घेतली असून, यावर सुनावणी होणार आहे. या एकूणच घटनाक्रमाबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे.
लखीमपूर खिरी घटनेवरून राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. लखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही. आम्ही केवळ आठ दिवस प्रतीक्षा करू. आठ दिवसात सरकारकडून ठोस पावले उचचली गेली नाहीत. अटक झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे.
देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे
केंद्र सरकारने किंवा उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भातील जे प्रमुख गुन्हेगार आहे त्यांना अटक केलेली नाही. त्यांच्या संदर्भात सगळे पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ हे समोर येऊन सुद्धा सरकार कुणाला वाचवत आहे? शेतकऱ्यांचा खून करणाऱ्याला सरकार वाचवत आहे. मग शेतकऱ्यांकरता कशाला अश्रू ढाळता. पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. या गंभीर प्रकरणाची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरुन पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लखीमपूर येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी निष्पाप शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केले आहे.