Sanjay Raut: “भाजपला घाबरत नाही, शिवसेना मोठा पक्ष, पुढील ५ वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:05 PM2022-03-18T12:05:11+5:302022-03-18T12:05:55+5:30
Sanjay Raut: भाजप पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली:महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. यातच गोवा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात भाजपची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपला कुणीही घाबरत नाही. शिवसेना मोठा पक्ष असून, पुढील पाच वर्षे पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी गोवा विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशावरही भाष्य केले. तसेच भाजपला पुन्हा सत्तेत न येऊ देण्याच्या शरद पवार यांच्या विधानाला समर्थन करत यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही
गोवा जिंकून आल्यापासून त्यांचे मनोबल वाढले आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचे राजकारण कळले नाही. गोवा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर...
भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग असून त्यावर केंद्र सरकारचीही बंदी आहे. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोज सुरु आहे. आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकललं जाईल हे दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान असते त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकद आहे, असे त्यांना वाटत असते. पण तसे नाही. कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत. ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार, असेही संजय राऊत म्हणाले.