Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:46 PM2022-06-15T14:46:15+5:302022-06-15T14:57:38+5:30
Sanjay Raut: शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
अयोध्या: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे अयोध्येत जोरदार स्वागत केले. तसेच याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बृजभूषण सिंह यांची अयोध्येत भेट घेतली. तसेच राज ठाकरे यांच्याविषयीच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. यातच बृजभूषण सिंह यांना अनेक वर्ष ओळखतो. ते शहाणे राजकारणी आहेत. राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अयोध्येत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बृजभूषण सिंह यांची बाजू घेतली. बृजभूषण सिंह यांना मी गेली अनेक वर्षे ओळखतो. ते कधीही विरोधासाठी विरोध करत नाहीत. बृजभूषण सिंह हे कुस्तीक्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरचं नाव आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह हे राज ठाकरे यांना विरोध करत असतील त्यामागे त्यांच्या राज्याच्या काही समस्या असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध
शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत. बृजभूषण सिंह यांना भेटलो. मी बृजभूषण सिंह यांना काही आज ओळखत नाही, गेल्या ३४-३५ वर्षांपासून ओळखतो. आम्ही नेहमी फोनवरून चर्चा करतो. पण बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांना का विरोध आहे, हे मला माहिती नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांना कोणीही विरोध करणार नाही. त्यांना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही. विरोध फक्त एकाच व्यक्तीला आहे, ज्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे माझा विरोध राज ठाकरे यांना आहे, ठाकरे कुटुंबाला नाही. त्यामुळे राज यांच्या आई, पत्नी किंवा कुटुंबातील कोणीही अयोध्येत आले तर मी स्वत: त्यांचे आदरातिथ्य करेन. परंतु राज ठाकरे यांना माझा विरोध कायम आहे. माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना विरोध कायम राहील, असे बृजभूषण यांनी स्पष्ट केले होते.