Maharashtra Politics: शिंदे गटाचा ‘दे धक्का’! संजय राऊतांना हटवणार; संसदेत गटनेतेपदी गजानन कीर्तीकरांची नियुक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:51 PM2023-02-28T19:51:46+5:302023-02-28T19:53:25+5:30
शिवसेना संसदीय पक्षाच्या गटनेतेपदावरुन संजय राऊतांना हटवण्यासाठी शिंदे गटाने प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: एकीकडे शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून, शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवल्यानंतर दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदासाठी गजानन कीर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार
संसदीय पक्षाच्या गटनेतेपदावरुन संजय राऊत यांना हटवण्यासाठी शिंदे गटाने प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. तर, ५ खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत. राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. आता, संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे फोटो
उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेने परिषदेत विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. विधान परिषदेत उद्धव ठाकरे आमदार आहे आणि सभागृहात प्रतोदचा व्हीप हा महत्वाचा असतो. त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हीप हा उद्धव ठाकरेंना मान्य करावा लागणार का, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत. त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील आणि संसदेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"