“INDIA म्हणजे PM मोदी हीच आमची भावना, विरोधी पक्षांना ते नाव वापरण्याचा अधिकार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:56 PM2023-07-19T21:56:40+5:302023-07-19T21:58:04+5:30
NDA Vs INDIA: हे सगळे विरोधी पक्ष कुटुंब आणि मुलांसाठी एकत्र आले होते. आमची बैठक देशासाठी होती, अशी टीका करण्यात आली आहे.
NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरूत पार पडली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. तर, विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA ची एक बैठक दिल्लीत झाली. या दोन्ही बैठकांना दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली. देशभरातील ३८ पक्ष एनडीएसोबत असून, २६ पक्षांनी विरोधी गट इंडियाला पाठिंबा दिला. यानंतर आता दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
विरोधकांच्या बैठकीवर टीका करताना राहुल शेवाळे म्हणाले की, हे सगळे पक्ष एकत्र झालेले पक्ष कुटुंबासाठी एक झाले आहेत. त्यांची बैठक कुटुंब, मुलंबाळं वाचवण्यासाठी झाली होती. मात्र, आमची बैठक देशासाठी होती. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकील सुरुवात झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. पुढील लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींना निवडून द्यायचे हा संकल्प आम्ही केला आहे, असे राहुल शेवाळे यांनी नमूद केले.
INDIA नाव लावण्याचा विरोधकांना अधिकार नाही
INDIA हा शब्द विरोधी पक्षांना वापरण्याचा अधिकार नाही. INDIA म्हणजे मोदी ही आमची भावना आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. INDIA नाव लावण्याचा विरोधकांना अधिकार नाही, अशी टीका राहुल शेवाळे यांनी केली. तसेच मुंबई, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या मुद्यांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कृषी संदर्भातील मुद्दे, मराठी भाषेला अभिजात दर्जा यावर प्रस्ताव द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
दरम्यान, समान नागरी कायदा देशात लागू होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर, आम्ही यापूर्वीच त्याला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा तो अजेंडा होताच. तो आता पूर्ण होईल असे वाटते. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी जे करतील त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.