ठरलं! CM एकनाथ शिंदे स्वतः प्रचारात उतरणार; शिवसेनेचा ४ राज्यांमध्ये भाजपला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 01:49 PM2023-11-12T13:49:34+5:302023-11-12T13:53:23+5:30
Shiv Sena Shinde Group News: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार असून, त्याबाबतचे पत्र राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आले आहे.
Shiv Sena Shinde Group News: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. भाजपसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाने चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील भाजपचा प्रचार करायला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी चार राज्यांच्या प्रचारात भाजपचा झेंडा हाती घेण्याचे ठरविल्याबाबतचा निर्णय राहुल शेवाळे यांच्यामार्फत भाजप नेतृत्वाला नुकताच कळविला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना हा भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्वांत जुना आणि महत्त्वाचा घटकपक्ष आहे. एनडीएमधील सर्वांत पहिला मित्रपक्ष पंजाबमधील शिरोमणी अकाली दर असल्याचे सांगण्यात येते. मात्र हा पक्ष सध्या तरी भाजपसोबत नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष एनडीएमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. या चार राज्यातील निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याबाबतचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांना राहुल शेवाळे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः करणार भाजपचा प्रचार?
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगण या चार राज्यातील निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्यावर न थांबता केंद्रातील या सत्ताधारी पक्षाचा प्रचारही करण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करणार आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राजस्थानात शिवसेनेने विधानसभेच्या काही जागा लढविण्याचे यापूर्वी जाहीर केले, त्या उमेदवारांना माघार घेणे क्रमप्राप्त ठरणार का, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. राजस्थान विधानसभेत वादग्रस्त लाल डायरी झळकविणारे राजेंद्र गुढा यांना शिवसेनेने उदयपूरवाटीतून उमेदवारी दिली आहे. याबाबत दोन्ही पक्षाचे नेते मार्ग काढतील, असे राहुल शेवाळे म्हणाले.