"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:42 AM2020-05-05T07:42:24+5:302020-05-05T07:45:59+5:30

काश्मीरच्या हंदवाड्यात कर्नल, मेजर यांच्यासह ४ जण शहीद; एका पोलीस कर्मचाऱ्यालाही वीरमरण

shiv sena slams modi government after 4 army personnel one police martyred in kashmir kkg | "त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

Next

मुंबई: देशातल्या कोरोना योद्ध्यांना रविवारी सैन्यानं रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करून, रुग्णालयांसमोर बँड वादन करून मानवंदना दिली. मात्र त्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या हंदवाड्यात कर्नल, मेजर यांच्यासह दोन जवान शहीद झाले. यावरून शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कश्मीरमध्ये शहीद होणार्‍या जवानांना श्रद्धांजल्या वाहून आणि उसासे सोडून काय होणार?, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

उत्तर कश्मीरमधील हंदवाडा क्षेत्रात शनिवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात हिंदुस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांचे बलिदान झाले असून हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी भावनिक आवाहन केले आहे. या कोरोना योद्ध्यांवर फुले बरसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सैन्याच्या तिन्ही दलांना मैदानात आणि आकाशात उतरवले. कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी आकाशातून या 'कोरोना योद्ध्यां'वर पुष्पवृष्टी केली. काही ठिकाणी लष्कराच्या बॅण्ड पथकानेही मानवंदना दिली. पायदळ व नौदलानेही या मानवंदना सोहोळ्यात भाग घेतला. हासुद्धा एक वेगळाच सोहळा घडवून आणला, पण त्याचवेळी कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांबरोबर चकमक सुरू होती. कर्नल आशुतोष शर्मा व त्यांचे चार सहकारी देश रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते. या लढाईत हे पाचही वीर हुतात्मा झाले. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या. एकाच वेळी आमचे पाच शूर जवान मारले जातात हे चांगले लक्षण नाही. आमच्याच भूमीवर आमचे जवान वारंवार मारले जातात. दिल्लीत एक मजबूत आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त वगैरे सरकार असताना हे घडत आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं मोदी सरकारवर तोफ डागली.

हंदवाडाच्या लष्करी तळावर कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून ठेवले. हे छायाचित्र प्रत्येक देशवासीयाला वेदना देणारे आहे. 'जय हिंद'चा नारा घशातच गुदमरून टाकणारे हे दृष्य आहे. कोरोना यो द्ध्यां वर हिंदुस्थानी लष्कर आकाशातून फुलांची उधळण करीत असताना कश्मीरची जमीन कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांच्या रक्ताने भिजली आहे . हे चित्र चांगले नाही, इतकेच आम्ही सांगू शकतो. सारा देश कोरोनाशी युद्ध लढत आहे व हे युद्ध आणखी किती काळ चालेल ते सांगता येत नाही. या गडबडीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे? त्याकडे आपला कानाडोळा झाला आहे. हा कानाडोळा शनिवारी बहुधा सैल झाला असावा. कश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती आणि हल्ले वाढले आहेत. कर्नल आशुतोष शर्मा व त्यांचे चार सहकारी देश रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते. या लढाईत हे पाचही वीर हुतात्मा झाले. पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा झालेल्या या शूर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कर्तव्य बजावले आहे. पाचही वीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे व त्यातील एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू -मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये, असं शिवसेनेनं सामनामधून म्हटलं आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही; खर्चाला ६७% कात्री

६०० कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे थंडावली; देशातील आर्थिक घडामोडी ठप्प

राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

Web Title: shiv sena slams modi government after 4 army personnel one police martyred in kashmir kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.