मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:34 AM2019-02-05T07:34:45+5:302019-02-05T07:37:47+5:30

सीबीआय अर्धमेला पोपट, त्यावर विश्वास कसा ठेवायचा; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

shiv sena slams pm narendra modi over misuse of cbi praises west bengal cm mamata banerjee | मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

Next

मुंबई: शारदा चिट फंड घोटाळ्यातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चिट इंडिया’ प्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत, असेदेखील शिवसेनेने सुनावले आहे.

पश्चिम बंगालच्या भूमीवर जे राजकीय युद्ध पेटले आहे ती नव्या अराजकतेची ठिणगी आहे. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा हा सामना नसून ममता विरुद्ध मोदी, भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसची ही लढाई आहे. प. बंगालातले नाटय़ धक्कादायक आहे. कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरी सी.बी.आय.चे पथक पोहोचले. शारदा चिट फंड घोटाळय़ात सी.बी.आय.ला आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायची होती. पण देशातील प्रमुख, सर्वोच्च तपास यंत्रणेचे अधिकारी कोलकाता आयुक्ताच्या घरी पोहोचले ते इतक्या गडबडीत की त्यांच्याकडे तपासासंदर्भात कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडे समन्स नसल्याने सी.बी.आय. पथक बेकायदेशीर घुसले असा ठपका ठेवून कोलकाता पोलिसांनी सी.बी.आय.च्या पथकालाच अटक केली. मुख्यमंत्री ममता यांनी संपूर्ण प. बंगालात व नंतर देशभरात जो हंगामा केला त्यातून देशातील सद्यस्थितीचे दर्शन घडत आहे. न्यायालये, रिझर्व्ह बँक, नीती आयोग व सी.बी.आय.सारख्या संस्थांनी गेल्या काही वर्षांत आपली प्रतिष्ठा गमावली आहे. दिल्लीत ज्यांची सत्ता त्यांच्या मनगटावर बसलेले पोपट अशी या संस्थांची अवस्था झाली. अशा पोपटांवर भरवसा कसा ठेवायचा?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित नव्या झगड्यामागे आहे. 2014 प्रमाणे भाजपला यश मिळत नाही. किमान शंभर जागा उत्तरेपासून महाराष्ट्रापर्यंत कमी पडतील. त्या शंभर नव्या जागांची भरपाई करण्यासाठी भाजप सरकार प. बंगालसारख्या राज्यांकडे आशेने पाहत आहे. प. बंगालसारख्या राज्यातून दहा-पंधरा जागा पदरात पाडून घ्याव्यात व इतर राज्यांतून घट भरून काढावी व शंभरची ‘घट’ कमी करावी, यासाठी कोणत्याही थराला जावे असा हा सगळा डाव आहे. प. बंगालात ‘रथयात्रे’चे राजकारण झाले. तेथे संघर्षाची ठिणगी पडली. ममता बॅनर्जी दुर्गामातेच्या विरोधात आहेत, त्यामुळे बंगालातील हिंदूंनी भाजपास मतदान करावे ही भाजपची भूमिका ठीक आहे, पण अयोध्या रथयात्रा काढून शेकडो करसेवकांचे बळी घेऊनही अयोध्येत राममंदिर का उभे राहिले नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिरावरुन भाजपाला लक्ष्य केले.

बंगालच्या वाघिणीने सगळय़ांनाच दे माय धरणी ठाय करून सोडले आहे, असं कौतुक शिवसेनेने केले आहे. सी. बी. आय.च्या अधिकाऱ्यांना ममता यांनी रोखले व देशात गरम हवा निर्माण केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आता प. बंगालमधील सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. ‘‘सीबीआय अधिकाऱ्यांविरोधात राज्य पोलिसांनी अशी कारवाई करण्याचा प्रकार देशात प्रथमच घडला असून तो ‘दुर्दैवी’ आणि ‘अभूतपूर्व’ आहे’’ असे तर ते म्हणालेच, पण केंद्राला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत याचीही जाणीव राजनाथ यांनी करून दिली आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी व्यक्त केलेले मत केंद्र सरकार आणि ममता सरकार यांच्यातील राजकीय संबंध किती टोकाचे ताणले गेले आहेत याचेच द्योतक म्हणावे लागेल. केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर देत आहेत. पुन्हा सी. बी. आय.ला चौकशीसाठी जायचेच होते तर मग सोबत ‘समन्स’ का नेले नाही?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

Web Title: shiv sena slams pm narendra modi over misuse of cbi praises west bengal cm mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.