जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:58 AM2020-08-17T07:58:21+5:302020-08-17T07:59:05+5:30

कोरोना, लॉकडाऊनमुळे फटका बसलेली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे गेलेल्या रोजगारांवर शिवसेनेचं भाष्य

shiv sena takes dig at pm narendra modis independence day speech | जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण

जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण

Next

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीस्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं सामर्थ्य भारतात असल्याचं मत व्यक्त केलं. त्यावर जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनामधून टीका केली आहे.

देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण-
- पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे.
- पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. समाधानाची बाब इतकीच की, जम्मू-कश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकामध्ये डौलाने तिरंगा फडकला आहे. 370 कलम हटवल्याचा हा परिणाम आहे हे मान्य केले तरी तेथील रक्तपात थांबलेला नाही व भयही संपलेले नाही. 
- पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव 'मास्क'मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.
- पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या तीन लसी जोपर्यंत बाजारात येत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थानातील भय संपणार नाही. प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे; पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय?
- आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते.  

Web Title: shiv sena takes dig at pm narendra modis independence day speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.