“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:58 PM2023-11-01T12:58:49+5:302023-11-01T12:59:42+5:30
Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
Shiv Sena Thackeray Group: राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. यातच आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देत, पाणी पिणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहिले असून, भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या विषयांतर्गत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी भेट घेऊ इच्छितात. कृपया आपल्या सोयीनुसार वेळ द्यावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या खासदार अन् आमदारांच्या शिष्टमंडळात कोण?
खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी. शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.