Sanjay Raut: “लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय; भाजपला जागा दाखवणार!”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:25 PM2023-03-10T12:25:29+5:302023-03-10T12:26:36+5:30

Sanjay Raut: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली.

shiv sena thackeray group sanjay raut said maha vikas aghadi will fight lok sabha and vidhan sabha election jointly | Sanjay Raut: “लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय; भाजपला जागा दाखवणार!”

Sanjay Raut: “लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय; भाजपला जागा दाखवणार!”

googlenewsNext

Sanjay Raut: राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा-विधानसभा एकत्रित लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असून,  भाजपला जागा दाखवणार असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत आणखी काही भूमिका ठरल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. 

महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल

राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. ही महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवा, अशा प्रकारचे जात दाखवण्याचे काम राज्य करत आहे. आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल. शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याबाबत कधीही समझोता करणार नाही. अवकाळी पावसामुळे नकुसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी दिली. तसेच सामान्य माणसाला न्याय मिळावा या हेतूने शिवसेना काम करत असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ठाण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर संजय राऊतांनी खोचक टीका केली. कुणी कुणाच्या वाटेला गेले नाही. राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याइतका पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद का गेले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाची आणखी वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सरकार ईडी, सीबीआयचा वापर करून पाडण्यात आले आणि जोडीला खोके देण्यात आले. ईडी काय आहे ते मी राज यांना सांगणार नाही, त्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे, अशी संजय राऊतांनी अतिशय शेलक्या शब्दांत राज यांच्यावर टीका केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group sanjay raut said maha vikas aghadi will fight lok sabha and vidhan sabha election jointly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.