Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:59 PM2022-12-08T21:59:36+5:302022-12-08T22:00:46+5:30
Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केली जाणारी आक्षेपार्ह विधाने, निवडणुका या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना दुसरीकडे ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणखी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करावेत, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले होते.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. ४० आमदार आणि १२ खासदांचा पाठिंबा मिळाल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव आपल्याला मिळावे, यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ नाव आणि पक्ष चिन्ह गोठवून शिंदे गट आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले. तसेच पक्षाला असलेल्या पाठिंब्याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते.
निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होण्याचे चित्र
निवडणूक आयोगाने पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कागदपत्रांची मागणी दोन्ही गटांकडे केली होती. पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने २० लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर केले. तर, तेवढेच प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल करणार असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाने नेमकी किती प्रतिज्ञापत्रे सादर केली?
शिंदे गटानेही आपला पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे ४० आमदार आणि १३ खासदारांसोबत शिंदे गटाने आपलाच गट खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आतापर्यंत १० लाख ३० हजारांच्या घरात सदस्यत्व अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. त्याशिवाय १.८ लाख पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून आणखी १० लाख अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने आपल्या गटात असलेल्या सदस्यांचे २० लाखांहून अधिक अर्ज-प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे जमा केले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्याशिवाय, आम्ही तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा प्रमुखांपासून ते गटप्रमुखांचा समावेश आहे. त्याशिवाय इतरही काही कागदपत्रे सादर केली असल्याचे देसाई यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने जवळपास ८.५ लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केले होते. हे प्रतिज्ञापत्र दोन ट्रक भरून आणले गेले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"