"आम्हालाही बोलवा ना, आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो"; संजय राऊतांचे भाजपला चिमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:03 PM2024-12-03T12:03:55+5:302024-12-03T12:07:40+5:30
Sabarmati Report Movie Special Screening: 'द साबरमती रिपोर्ट'चे स्पेशल स्क्रीनिंग संसदेच्या बाल योगी सभागृहात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या मंत्री खासदारांनी हा चित्रपट बघितला.
Sanjay Raut Sabarmati Report Movie: 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असून, सोमवारी संसदेच्या बालयोगी सभागृहात चित्रपट दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, एनडीएचे खासदार हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटे काढले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले.
संसदेच्या बाल योगी सभागृहात 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या मंत्री आणि खासदारांनी हा चित्रपट बघितला. याबद्दल खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
संभल फाईलही काढतील, राऊतांची टीका
संजय राऊत म्हणाले, "साबरमती, काश्मीर फाईल, ताश्कंद फाईल... उद्या संभल फाईल काढतील. मग महाराष्ट्र फाईल काढतील. या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि त्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच पैसे देतात. स्वतःच प्रेक्षक पाठवतात. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर काढतील. इंदिरा गांधींवर सिनेमा एक काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतील."
"मणिपूर फाईल काढा. महाराष्ट्रात जो खेळ झाला, संविधानाची हत्या करण्याचा; त्यावर सिनेमा काढा. आम्ही काढणार आहोत. बहुतेक एकनाथ शिंदे काढतील. त्यांनी धर्मवीर दोन, तीन, चार... आता किती काढताहेत पाच-पंचवीस मला माहिती नाही. तर असे सिनेमे ते बघतात, काढतात. आणि फक्त एनडीएच्या लोकांनाच बघायला बोलवतात", असा टोला संजय राऊतांनी लगावला.
'आम्हीही सिनेमाप्रेमी, आम्हाला सिनेमा बघायला बोलवा'
संजय राऊत पुढे म्हणाले, "आम्हालाही बोलवा ना. आम्हीही सिनेमाप्रेमी आहोत. पाहू ना आम्ही. त्याचं विश्लेषण करू. असे आहे की, त्यामध्ये काही तांत्रिक चुका आहे का? कलाकार कुठे चुकले आहेत का? उत्तम कुणी काम केलंय का? आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो. सिनेमे काढतो. कथानके लिहितो. आम्ही लेखक आहोत, साहित्यीक आहोत", अशी टीका संजय राऊतांनी केली.
"आम्हाला कळतं, साहित्य कला. महाराष्ट्र हा कलेचा भोक्ता आहे, पण आम्हाला बोलवणार नाही. हे सगळे टाळ्या वाजवणारे चमचे, उसासे सोडणारे लोक बोलवणार... क्या बात है, वाह वाह वाह.... मणिपूरला जा. मणिपूरवर सिनेमा काढा. कश्मिरी पंडित ज्या परिस्थितीत राहताहेत अजून त्यांची फाईल उघडा", अशा शब्दात राऊतांनी भाजपवर हल्ला चढवला.