'आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:25 AM2023-12-02T08:25:33+5:302023-12-02T08:29:53+5:30
निवडणुकांनंतर गॅस दरवाढ केल्याचं म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
'निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी आहे. त्यातही गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत मोदी सरकार नेहमीच धूळफेक करीत असते,' असं म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला.
'आताही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यावसायिक गॅसच्या दरकपातीची धूळ सरकारने जनतेच्या डोळय़ात फेकली आणि मतदान आटोपताच दरवाढ करून आपले ‘खायचे दात’ पुन्हा एकदा दाखविले. अर्थात, जनता आता तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत जनता तुमचे दात तुमच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही,' असं त्यांनी म्हटलंय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानं सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
काय म्हटलेय अग्रलेखात?
पाच राज्यांमधील मतदान पार पडले आणि मोदी सरकारने तोपर्यंत झाकून ठेवलेली दरवाढीची कुऱ्हाड बाहेर काढली. राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा गुरुवारी संपला. तेलंगणा राज्यातील मतदान संध्याकाळी संपले, पाचही राज्यांचे ‘एक्झिट पोल’ समोर आले आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढविण्यात आल्या, असं संपादकीयमध्ये नमूद केलंय.
'फसवाफसवीचा खेळ'
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी एलपीजीच्या पिंमती सरकारने तब्बल 50 रुपयांनी कमी करून सामान्यांना दिलासा वगैरे देण्याचे नाटक केले होते. अर्थात हा फसवाफसवीचा खेळ जनतेच्याही लक्षात आला आहे. तरीही त्याचा परिणाम कुठे ना कुठे, काही ना काही प्रमाणात होईल, या भरवशावर सध्याचे राज्यकर्ते असतात. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीपूर्वी प्रामुख्याने गॅस आणि इंधन दरकपातीचा ‘प्रयोग’ मोठी जाहिरातबाजी करून लावला जातो आणि मतदानानंतर त्यावर पडदा टाकून दरवाढीचा फणा बाहेर काढला जातो, असं म्हणत सरकारवर यातून टीका करण्यात आलीये.
'आता १ तारखेचं कारण'
आता तर सरकारला १ तारखेचे आणखी एक कारण सापडलं आहे. कारण दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. मोदी सरकार एक बोट आता त्याकडेही दाखवेल आणि मतदान संपल्याचा गॅस दरवाढीशी काही संबंध नाही, अशी मखलाशी करेल. शिवाय ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरचीच आहे, घरगुती गॅसचे भाव आम्ही वाढविलेले नाहीत, असा मानभावीपणाही सत्ताधारी करीत असल्याचंही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलंय.