Nitesh Rane: “नारायण राणेंना आता देशाचा कायदा माहीत झाला असेल”; नितेश राणेप्रकरणी शिवसेनेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 07:08 PM2022-02-01T19:08:07+5:302022-02-01T19:08:56+5:30
Nitesh Rane: पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
नवी दिल्ली: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांना शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी पुन्हा एकदा धक्का बसला आहे. नीतेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, नारायण राणे आणि नीतेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते, तर बरे झाले असते. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरुन जे आहे ते पोलीस करत आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
देशातील कायदा नारायण राणेंना माहिती झाला असेल
आत्ता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहिती पडले देशातील कायदा नेमका काय आहे तो. यापूर्वी नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये मारा, ठोका आणि पळून जा अशा पद्धतीने सुरु होते. यामुळे कायद्याचे हात किती लांबपर्यंत जाऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे, अशी टीका करत निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असते, त्यावर काही बालायचे नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण दिले असल्याने पोलिसांना अद्याप नितेश राणेंना अटक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता.